Join us

प्रत्येक कुटुंबाच्या भावनांना स्पर्श करणारी कहाणी; ‘तू माझा किनारा’ चित्रपटाची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 08:16 IST

भूषण प्रधान, केतकी नारायण यांचा आगामी सिनेमा तू माझा किनारा सिनेमाची चांगलीच चर्चा होत आहे. ३१ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय

गेल्या महिनाभरापासून प्रेक्षकांच्या उत्सुकतेच्या केंद्रस्थानी असलेला ‘तू माझा किनारा’ हा मराठी चित्रपट आता अखेर प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाची प्रदर्शन तारीख ३१ ऑक्टोबर २०२५ अशी जाहीर करण्यात आली आहे. वडील आणि मुलीच्या नात्याचा भावस्पर्शी प्रवास दाखवणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी सोशल मीडियावर या ट्रेलरचे कौतुक करत, कथेत दडलेले भावविश्व आणि अभिनयाची ताकद अधोरेखित केली आहे. आता सर्वांनाच या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहायची कारणं मिळाली आहेत.

‘तू माझा किनारा’ ही कथा आहे प्रत्येक वडिलांची, ज्यांना आपल्या मुलीबद्दल खूप सांगायचं असतं पण शब्द सापडत नाहीत आणि प्रत्येक मुलीची, जी आपल्या बाबांना समजून घ्यायचा प्रयत्न करत राहते. ही कथा आहे एका अशा कुटुंबाची, जे प्रेम, संघर्ष आणि समजुतीच्या दरम्यान स्वतःचा “किनारा” शोधतं. हा सिनेमा केवळ बाप लेकिच्या नात्याची कथा नाही, तर प्रत्येक घरात घडणारी गोष्ट आहे. आई वडील, मुलं, त्यांच्या भावना, छोट्या-छोट्या गोष्टींवरून होणारे वाद आणि न बोलता उमटणारे प्रेम, हे सगळं ‘तू माझा किनारा’च्या प्रत्येक क्षणात जाणवतं.

चित्रपटात भूषण प्रधान, केतकी नारायण आणि लहानगी केया इंगळे यांच्या भावनिक अभिनयाची मोहोर उमटलेली आहे. तिघांची पडद्यावरची केमिस्ट्री ही या चित्रपटाची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे. अनुभवी कलाकार अरुण नलावडे आणि प्रणव रावराणे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका या कथेला अधिक खोल रूप देणार आहेत. यांच्यासोबतच जयराज नायर, सिमरन खेडकर, दीपाली मालकर, रेखा राणे हे कलाकार दिसणार आहेत.

लायन हार्ट प्रॉडक्शन प्रा. लि. प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती जॉइसी पॉल जॉय यांनी केली असून, सह-निर्माते सिबी जोसेफ आणि जॅकब जेव्हियर आहेत. कथा, पटकथा आणि दिग्दर्शन क्रिस्टस स्टीफन यांचे असून, त्यांनी बाप लेकिच्या नात्यातील सूक्ष्म भावना अत्यंत संवेदनशीलतेने उलगडल्या आहेत. रूपांतरित पटकथा आणि संवाद चेतन किंजळकर यांनी लिहिले आहेत. चित्रपटाचं छायांकन एल्धो आयझॅक, संकलन सुबोध नारकर आणि कला दिग्दर्शन अनिल केदार यांनी उत्कृष्टरीत्या साकारलं आहे.

चित्रपटाच्या संगीताची जादू उलगडली आहे क्रिस्टस स्टीफन आणि संतोष नायर यांनी, तर हृदयाला भिडणारी गाणी लिहिली आहेत समृध्दी पांडे यांनी. अभय जोधपूरकर, शरयू दाते, साईराम अय्यर, शर्वरी गोखले आणि अनिश मॅथ्यू यांच्या सुरेल आवाजाने या गीतांना जीव दिला आहे. जॉर्ज जोसेफ यांच्या पार्श्वसंगीताने प्रत्येक दृश्याला भावनिक साद मिळाली आहे.

चित्रपटामागे उभं आहे एक दमदार आणि अनुभवी पथक वेशभूषेत दर्शना चौधरी, रंगभूषेत सुनील सावंत आणि नृत्य दिग्दर्शनात सुनील साळे यांनी आपला खास ठसा उमटवला आहे. साऊंड डिझाइन आणि री-रेकॉर्डिंग मिक्सिंगचे कसब दाखवले आहे अभिजीत श्रीराम देव यांनी, तर डी आय कलरिस्ट भूषण दळवी आणि व्हिज्युअल फॉक्स स्टुडिओचे अभिषेक मोरे यांनी चित्रपटाला व्हिज्युअली आकर्षक रूप दिले आहे.

चित्रपटाच्या जनसंपर्काची जबाबदारी सांभाळली आहे अमेय आंबेरकर (प्रथम ब्रँडिंग) यांनी, तर डिजिटल स्ट्रॅटजी मीडिया वन सोल्युशनने हाताळली आहे. आकर्षक पब्लिसिटी डिझाइन्ससाठी ब्रिजेश कल्याणजी देढिया, आणि व्हिज्युअल प्रमोशनसाठी नरेंद्र सोलंकी यांचे योगदान लक्षणीय आहे. विपुल सोनवणे (असोसिएट डायरेक्टर) आणि विशाल सुभाष नांदलजकर (मुख्य सहाय्यक दिग्दर्शक) यांच्या समन्वयाने आणि सम्मिट स्टुडिओच्या पोस्ट-प्रॉडक्शन ताकदीने हा चित्रपट अधिक प्रभावी बनला आहे. ‘तू माझा किनारा’ केवळ एक कथा नाही, तर एक कलात्मक अनुभव आहे, जिथे प्रत्येक फ्रेम, प्रत्येक सूर आणि प्रत्येक भाव तुमच्या मनाला भिडणार आहे!

English
हिंदी सारांश
Web Title : Touching father-daughter story: 'Tu Majha Kinara' film creates buzz.

Web Summary : 'Tu Majha Kinara,' releasing October 31, 2025, explores the father-daughter bond. The film depicts love, struggles, and understanding within a family, featuring stellar performances by Bhushan Pradhan and Ketaki Narayan. It promises an emotionally resonant cinematic experience with heartfelt music and visuals.
टॅग्स :भुषण प्रधानमराठी चित्रपटमराठी अभिनेता