Join us

कलेला कसलेच बंधन नसते

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 17:45 IST

कलेला कोणत्याही भाषेचे बंधन नसते असे म्हटले जाते. सध्या मराठी इंडस्ट्री आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये कलाकार, तंत्रज्ञ, गायक यांची देवाणघेवाण ...

कलेला कोणत्याही भाषेचे बंधन नसते असे म्हटले जाते. सध्या मराठी इंडस्ट्री आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये कलाकार, तंत्रज्ञ, गायक यांची देवाणघेवाण सुरू आहे असे म्हटले तर काहीही चुकीचे ठरणार नाही. अनेक मराठी इंडस्ट्रीतील लोक सध्या दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत तर काही दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील लोक मराठीत. सध्याच्या या ट्रेंडवर टाकलेली एक नजर...
 
राधिका आपटे 
मराठीत चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्यानंतर रक्त चरित्र या चित्रपटाद्वारे तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचे नामांकनही मिळाले होते. तिने गेल्या सहा वर्षांत अनेक दाक्षिणात्य चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या कबाली या चित्रपटात ती सुपरस्टार रजनिकांतसोबत झळकली होती. 
 
नेहा पेंडसे 
नेहाने हसरते या हिंदी मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. प्यार कोई खेल नही हा तिचा पहिला चित्रपट होता. हिंदीत काम केल्यानंतर ती मराठी चित्रपटांकडे वळली. याच दरम्यान 2005मध्ये मेड इन युएस या चित्रपटाद्वारे तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तिने आतापर्यंत अनेक मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.
 
ऋती मराठे
ऋतीने मराठी आणि दाक्षिणात्य दोन्ही चित्रपटसृष्टीत एकाच वेळी पदार्पण केले. तिचा सनई चौघडे हा पहिला मराठी चित्रपट प्रचंड गाजला. गेल्या सात वर्षांत तिने अनेक सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. 
 
सय्याजी शिंदे 
सय्याजी शिंदे हे नाव आज बॉलिवुड, मराठी इंडस्ट्री आणि दाक्षिणात्य इंडस्ट्री अशा तिन्ही इंडस्ट्रीमध्ये चांगलेच प्रसिद्ध आहे. सय्याजी यांनी मराठीपेक्षा दाक्षिणात्य चित्रपट अधिक केलेले आहेत. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत त्यांच्या नावाचा चांगलाच दबदबा आहे.
 
नेहा महाजन
कॉफी आणि बरंच काही, युथ या चित्रपटांनंतर नेहा पेंटेड हाऊस या दाक्षिणात्य चित्रपटात झळकली. पेंटेड हाऊस या चित्रपटात एका दृश्यात ती संपूर्णपणे न्यूड आहे. या चित्रपटामुळे नेहा चांगलीच चर्चेत आहे. नेहाच्या या पहिल्या दाक्षिणात्य चित्रपटाला सेन्सॉरकडून प्रमाणपत्र न मिळाल्याने हा चित्रपट भारतात प्रदर्शित होऊ शकला नाही.
 
सावनी रविंद्र
अनेक मराठी चित्रपटात आणि मालिकांत गायल्यानंतर गायिका सावनी रविंद्र आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीकडे वळली आहे. तिने सहा-सात दाक्षिणात्य चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले असून यातील अनेक चित्रपट या वर्षाच्या अखेरीपर्यंत प्रदर्शित होणार आहेत.
 
सुधाकर रेड्डी
अनेक दाक्षिणात्य चित्रपटांची सिनेमोटोग्राफी केल्यानंतर सुधाकर रेड्डी यांनी सैराट या चित्रपटासाठी सिनेमोटोग्राफी केली. सैराट चित्रपटाच्या त्यांच्या सिनेमोटोग्राफीचे सगळ्यांनीच प्रचंड कौतुक केले.
 
आर.मधेश
आर.मधेशने आतापर्यंत अनेक दाक्षिणात्य चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन आणि लेखन केले आहे. आर.मधेशने गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या फ्रेंडस या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. मराठीचा एकही शब्द न कळता त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत केलेल्या कामासाठी त्यांचे कौतुक करण्यात आले होते.