सध्या सोशल मीडियावर एक गाणं जोरदार ट्रेंडमध्ये आहे ते म्हणजे 'धतड तटड धिंगाणा'! 'पी.एस.आय.अर्जुन' (PSI Arjun Movie) चित्रपटातील हे प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. विशेषतः तरुण वर्ग यावर मोठ्या प्रमाणावर रील्स आणि व्हिडीओ तयार करत आहे. नुकताच या गाण्याचा व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आला असून यातील हूक स्टेप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. तरूणाईचा 'स्टाईल आयकॅान' असलेल्या अभिनेता अंकुश चौधरी(Ankush Chaudhari)चा या गाण्यातील रूबाबदार लूकही सध्या अनेकांना भावतो आहे.
या गाण्याचं संगीत जोशपूर्ण असून त्यात आधुनिक बीट्स आणि रॅपचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. बॉलिवूडचे नकाश अजीज आणि अंकुश चौधरी यांचा आवाज लाभलेल्या या गाण्याला जयदीप मराठे यांनी शब्दबद्ध केले आहे तर अनिरुद्ध निमकर यांचे एनर्जेटिक संगीत लाभले आहे. अनेक ट्विस्ट आणि टर्न्सनी भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येत असतानाच आता या व्हिडिओने संगीतप्रेमींना आणखी जबरदस्त सरप्राईज दिले आहे.
या चित्रपटात अंकुश चौधरी, किशोर कदम, राजेंद्र शिसतकर, नंदू माधव, कमलाकर सातपुते आणि अक्षया हिंदळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. व्हिस्ट्रोमॅक्स सिनेमा, ड्रिमविव्हर एंटरटेनमेंट निर्मित 'पी.एस.आय.अर्जुन' या चित्रपटाचे दिग्दर्शन भूषण पटेल यांनी केले असून विक्रम शंकर आणि ध्रुव दास निर्माते आहेत.