पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा मिलाफ असलेला बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘गोंधळ’ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे. गोवा येथे होणाऱ्या भारतीय सरकारच्या ५६ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियाच्या ‘इंडियन पॅनोरमा गोल्डन पिकॅाक सेक्शन’ मध्ये ‘गोंधळ’ची अधिकृत निवड झाली आहे. त्यामुळे गोंधळ चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये अधिकच वाढली आहे
या फेस्टिव्हलमध्ये ‘आता थांबायचं नाय!’ आणि ‘गोंधळ’ या चित्रपटाची अधिकृत निवड झाली असून या दोन्ही चित्रपटांच्या दिग्दर्शकांचे हे दिग्दर्शकीय पदार्पण आहे. मात्र ‘गोंधळ’ने एक पाऊल टाकत ‘इंडियन पॅमोरमा गोल्डन पिकॅाक अवॅार्ड’ विभागात स्थान पटकावले आहे. ‘सेलिब्रेट द जॉय ऑफ सिनेमा’ या घोषवाक्याने साजरा होणाऱ्या या प्रतिष्ठित महोत्सवात ‘गोंधळ’ची निवड होणे हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावखर दिग्दर्शित आणि डावखर फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट आपल्या मातीत रुजलेल्या परंपरा, लोककला आणि श्रद्धांचा अनोखा संगम दाखवतो. नवरा-नवरीच्या आयुष्यातील विघ्नं दूर करण्यासाठी साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक ‘गोंधळ’ विधीच्या पार्श्वभूमीवर आधारित हा सिनेमा केवळ धार्मिक विधीवर मर्यादित न राहाता मानवी भावना, अंधश्रद्धा, आणि समाजातील बदलणारे दृष्टिकोन यांचाही वेध घेतो. भव्य सादरीकरण, प्रभावी सिनेमॅटोग्राफी आणि तांत्रिक उत्कृष्टतेसह ‘गोंधळ’ मराठी संस्कृतीचं मूळ जागतिक प्रेक्षकांसमोर मांडतो. आता ‘गोंधळ’चा प्रवास स्थानिक पातळीवरून थेट आंतरराष्ट्रीय मंचावर पोहोचला आहे.
दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, “आमच्या टीमसाठी ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. ‘गोंधळ’ हा आपल्या मातीतला, श्रद्धा आणि परंपरांशी जोडलेला सिनेमा आहे आणि त्याची निवड भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आयोजिलेल्या इफ्फी सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणे म्हणजे आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचा सन्मान आहे. आमच्या कलेला जागतिक पातळीवर ओळख मिळत आहे, यापेक्षा मोठं बक्षीस काही असूच शकत नाही.”
संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ची कथा, पटकथा आणि संवाद स्वतः संतोष डावखर यांनी लिहिले असून सहनिर्माती दीक्षा डावखर आहेत. या चित्रपटात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील आणि ध्रुव ठोके हे नामवंत कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. ‘गोंधळ’ हा चित्रपट १४ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
Web Summary : Marathi film 'Gondhal', a blend of tradition and modernity, is selected for the International Film Festival of India. Directed by Santosh Dawkhar, the film explores faith, customs, and social change, showcasing Marathi culture on a global stage. It releases November 14.
Web Summary : मराठी फिल्म 'गोंधळ', जो परंपरा और आधुनिकता का मिश्रण है, को भारत के अंतर्राष्ट्रीय फिल्म समारोह के लिए चुना गया है। संतोष डावखर द्वारा निर्देशित यह फिल्म आस्था, रीति-रिवाजों और सामाजिक परिवर्तन की पड़ताल करती है, जो मराठी संस्कृति को वैश्विक मंच पर प्रदर्शित करती है। यह 14 नवंबर को रिलीज हो रही है।