Marathi Actress Jyoti Chandekar Passes Away: आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीत स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
ज्योती चांदेकर यांनी नाटकातून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती. नाटक,चित्रपट,मालिका अशा तिन्ही माध्यमातून त्यांनी काम केले.आईच्या पावलावर पाऊल टाकत अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनेही या क्षेत्राची वाट धरली.ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांच्या निधनाच्या बातमीने मराठी सृष्टीला खूपच मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या निधनानंतर मराठी कलाकारांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
सोनाली कुलकर्णीची भावुक पोस्ट
ज्योती चांदेकर यांच्या निधानाने मराठी सिनेविश्वात एक पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलंय, "ज्योतीताई... तुमची तडफ आणि कारकीर्द आमच्यासाठी अत्यंत प्रेरणादायी राहील... श्रद्धांजली."
सुचित्रा बांदेकर यांनी व्यक्त केल्या भावना...
ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी भावुक पोस्ट शेअर केली आहे."ज्योती ताई कि पुर्णाआजी काय म्हणू तुम्हाला….मला तुम्ही नेहमीच मायेनं भेटलात……सेटवरचं हसरं व्यक्तिमत्व म्हणजे तुम्हीआणि तरुण ही. १० तारखेला मला म्हणालात ५ दिवसात पुण्याला जाऊन मी परत येते…..नेहमी शब्द पाळणा-या यावेळी शब्द पाळला नाहीत …..खुप प्रेम ताई...", 'ठरलं तर मग' या मालिकेची निर्मिती ही सोहम प्रोडक्शनच्या बॅनरखाली झाली आहे.या मालिकेत ज्योती चांदेकर यांनी पूर्णा आजीची भूमिका साकारली.
मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ज्योती चांदेकर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. "ज्योती चांदेकर आई...",असं भावुक कॅप्शन त्याने त्या फोटोला दिलं आहे.
अभिनेत्री मुक्ता बर्वेने देखील तिच्या अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. "भावपूर्ण श्रद्धांजली ज्योती ताई... ", असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.
ज्योती चांदेकर यांचं निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. अभिनेता सुबोध भावेनेही त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर ज्योती चांदेकर यांचा फोटो शेअर करत दु:ख व्यक्त केलं आहे.
आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर ज्योती चांदेकर यांचा फोटो पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय, "ठरलं तर मग ! च्या सेटवरच्या तुमच्या गप्पा नेहमी सोहम कडून ऐकायचो… आजी आणि नातू हे आपुलकीच नातं आणि तुम्हा दोघांचा जिव्हाळ्याचा संवाद म्हणजे सोहमला आणि सोहम प्रोडक्शन्स ला मिळालेला आशिर्वाद आहे जो कायम स्मरणात राहील ! ज्योती ताई आपल्या कुटुंबाला सदैव तुमची उणीव भासत राहील…".
तुम्ही अशा अचानक निघून जाल असं वाटलंच नाही...
मराठमोळी अभिनेत्री वीणा जामकरने ज्योती चांदेर यांच्या निधनानंतर भावुक पोस्ट लिहीली आहे. "भावपूर्ण श्रद्धांजली ज्योती ताई..... तुम्ही अशा अचानक निघून जाल असं वाटलंच नाही... माझ्या पहिल्या सिनेमातल्या ( बेभान ), करिअर मधल्या पहिल्या ज्येष्ठ अभिनेत्री आहात तुम्ही.. सिनेमा Acting ची पहिली मुळाक्षरं मी तुम्हाला बघून गिरवली आहेत... 26 जुलै च्या पूरादरम्यान आपलं शूट चालू होतं.. पनवेलच्या सुर्वे फार्महाऊसला सगळीकडे पाणी भरलं होतं. प्रॉडक्शन मॅनेजर ने संरक्षण म्हणून मला तुमच्या रूम मधे शिफ्ट केलं होतं.. तेव्हा माझ्या डोक्यावर हात फिरवून मला थोपटत झोपवलं होतंत तुम्ही... मी तो क्षण कधीच विसरू शकत नाही... एका नवोदित अभिनेत्रीला तुम्ही दिलेला सन्मान, प्रेम, संरक्षण मला बरंच काही न बोलता शिकवून गेला... तुमची आठवण कायम हृदयात राहील...! Rest in Peace ताई..... I will miss you...", अशी पोस्ट लिहित अभिनेत्रीने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
सुशांत शेलार झाला भावुक
अभिनेता सुशांत शेलारने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत ज्योती चांदेकर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामध्ये त्याने म्हटलंय, "भावपूर्ण श्रद्धांजली ! नाट्य आणि सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाची बातमी अतिशय दु:खद आणि वेदनादायी आहे.त्यांच्या अप्रतिम अभिनयाने, कलेवरील निष्ठेने आणि संस्कारमय भूमिकांमुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला होता.त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना."