Join us

संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा थ्रीडी ॲनिमेटेड रूपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 13:13 IST

‘छावा’ असे या थ्रीडी ॲनिमेशनपटाचे नाव असून त्याचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवले. आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या साम्राज्याचा विस्तार केला. हिंदवी स्वराज्य निर्माण करणं हे सहज शक्य नव्हतं, पण त्याहून कठीण होतं ते निर्माण केलेलं स्वराज्य टिकवणं, वाढवणं. छत्रपती संभाजी महाराजांनी हे आव्हान स्वीकारलं आणि सक्षमपणे पेललं सुद्धा. या महान योद्ध्याचा पराक्रम आपल्याला लवकरच पहायला मिळणार आहे तोही थ्रीडी ॲनिमेटेड रूपात. 

‘छावा’ असे या थ्रीडी ॲनिमेशनपटाचे नाव असून भावेश प्रोडक्शनचे भावेश पाटील आणि शार्कफिन स्टुडिओचे ऋतूध्वज देशपांडे यांच्या प्रयत्नांतून हा थ्रीडी ॲनिमेशनपट साकारला जात आहे. ­‘छावा’चे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या थ्रीडी ॲनिमेशनपटाचे दिग्दर्शन भावेश पाटील यांचे आहे. गीते समीर नेर्लेकर तर संगीत प्रेम कोतवाल यांचे आहे. ध्वनी आरेखन संकेत धोतकर यांचे आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या अजोड पराक्रमाची गाथा पुढच्या पिढीपर्यंत अॅनिमेशनच्या माध्यमातून अधिक प्रभावी व रंजकपणे पोहचविता येईल या विचाराने ‘छावा’ या थ्रीडी ॲनिमेशनपटाची निर्मिती केली असल्याचे दिग्दर्शक भावेश पाटील सांगतात. संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा थ्रीडी ॲनिमेटेड रूपात पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

टॅग्स :संभाजी राजे छत्रपती