Join us

गायिका अन्वेषा दत्ताचा नवा अल्बम 'मन हे वेडे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 13:21 IST

'मन हे वेडे का पुन्हा, सांग ना…तुझ्यातच दिसते का पुन्हा, सांग ना…' असे या अल्बममधील गाण्याचे बोल आहेत.

ठळक मुद्दे 'मन हे वेडे…' अल्बम २५ ऑगस्टला होणार रिलीज

हिंदी व मराठी चित्रपटातील गाण्यांना आपल्या सूरांनी सजवणारी गायिका अन्वेषा दत्ताचा नवा मराठी अल्बम रसिकांच्या भेटीला येत आहे. 'मन हे वेडे' असे या अल्बमचे नाव असून हा अल्बम २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'मन हे वेडे का पुन्हा, सांग ना…तुझ्यातच दिसते का पुन्हा, सांग ना…' असे या अल्बममधील गाण्याचे बोल आहेत.

'मन हे वेडे…' या हृदयस्पर्शी गीताचे नुकतेच मुंबईतील ‘एम स्क्वेअर’ स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रण करण्यात आले. कवयित्री वैशाली मराठे यांनी लिहिलेल्या गीताला जीवन मराठे यांनी संगीत दिले असून प्रसिद्ध गायिका अन्वेषा हिने या गीताला स्वरसाज चढविला आहे. संगीत-संयोजन वरुण बिडये यांचे आहे तर तांत्रिक बाजू अनिल शिंदे यांनी सांभाळली आहे.'छोटे उस्ताद' या गाजलेल्या कार्यक्रमातून पुढे आलेली गायिका अन्वेषा दत्ता ही मूळची बंगाली असली तरी तिने आतापर्यंत विविध भाषांमधील गाणी गायली आहेत. यापूर्वी अन्वेषाने बबन या मराठी चित्रपटातील गाणी गायली असून त्याला प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला होता. 'मन हे वेडे…' या अल्बममधील गाणे देखील तिने अतिशय तरल आवाजात गायले  असून हा अल्बम देखील रसिकांना आवडेल असा विश्वास निर्मात्यांना आहे. या अल्बमची निर्मिती श्रीनिवास गोविंद कुलकर्णी यांनी केली असून तो येत्या २५ ऑगस्ट २०१८ रोजी प्रदर्शित होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. अन्वेषाचा हा नवा अल्बम ऐकण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.