सिध्दार्थ होणार का परीक्षेत पास?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 16:02 IST
सध्या प्रत्येक कलाकारामध्ये व्हाइट रॅबिट आणि रेड रॅबिट या नाटकाची क्रेझ निर्माण झाली आहे. कारण मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर, ...
सिध्दार्थ होणार का परीक्षेत पास?
सध्या प्रत्येक कलाकारामध्ये व्हाइट रॅबिट आणि रेड रॅबिट या नाटकाची क्रेझ निर्माण झाली आहे. कारण मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, आलोक राजवाडे यांच्या पाठोपाठ आता अभिनेता सिध्दार्थ मेननदेखील व्हाइट रॅबिट रेड रॅबिट हे नाटक सादर करणार आहे. या नाटकामध्ये कलाकाराला थेट रंगभूमीवर स्क्रीप्ट मिळते. त्याचबरोबर या नाटकाला दिग्दर्शकदेखील कोणी नसतं. त्यामुळे कलाकारांसाठी ही एक परीक्षाच असते. पण या सर्व कलाकारांपेक्षा सिध्दार्थची ही परीक्षा थोडी वेगळी असणार आहे. कारण यापूर्वी व्हाइट रॅबिट आणि रेड रॅबिट हे नाटक कलाकारांनी मराठी भाषेत सादर केले आहे. अभिनेता सिध्दार्थ मेनन याने हे नाटक इंग्रजी भाषेत सादर करणार असल्याचे लोकमत सीएनएक्सला सांगितले. त्यामुळे सिध्दार्थसाठी ही परीक्षा थोडी आव्हानात्मकच असणार आहे. त्यामुळे सिध्दार्थला आपला अभिनय पुन्हा सादर करण्याची एक संधी मिळणार आहे. त्याच्या या परीक्षेविषयी सिध्दार्थ सांगतो, या नाटकाची स्क्रीप्ट थेट रंगभूमीवर मिळणार असल्याने थोडी भीती तर वाटतच आहे. कारण कोणत्याही परीक्षेला जाण्यापूर्वी आपण अभ्यास करून त्या परीक्षेला उतरत असतो. माझ्या अभ्यासाचा विषयच माहित नसल्यामुळे तयारी काय करू. माझ्या आयुष्यातील केलेल्या सर्व नाटकांचा अनुभवच मला या नाटकासाठी उपयोगी पडणार आहे. थोडक्यात हाच माझा अभ्यास असणार आहे. त्याचप्रमाणे ही परीक्षा माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. मात्र मी परीक्षेसाठी खूप उत्साही असल्याचेदेखील त्याने यावेळी सांगितले. सिध्दार्थबरोबरच त्याच्या चाहत्यानादेखील या नाटकाची उत्सुकता लागली आहे.