Join us

"आपण आईला 'माँ' असं म्हणत नाही" हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सिद्धार्थ जाधवची स्पष्ट भूमिका, म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 11:50 IST

अभिनेता सिद्धार्थ जाधवनं हिंदी सक्तीचा जीआर रद्द झाल्याच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला.

Siddharth Jadhav Reacted To Hindi Language Compulsion In Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून हिंदी भाषा सक्तीमुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. सरकारच्या हिंदी भाषाच्या सक्तीला राजकीय वर्तुळासह मराठी मनोरंजन क्षेत्रातूनही विरोध झाला होता. मराठीप्रेमी कलाकारांनी हिंदी सक्तीविरुद्ध आवाज उठवला होता. संपुर्ण स्तरातून तीव्र विरोधाचा सामना करावा लागल्यानंतर राज्य सरकारने त्रिभाषा सूत्राअंतर्गत इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय लागू करण्याचे दोन्ही शासन निर्णय रद्द केले आहेत. सरकारच्या या निर्णयावर अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली. 

सिद्धार्थ जाधव 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "विरोध हा हिंदी भाषेला कधीच नव्हता, तो सक्तीला होता. आम्हाला पाचवीपासून हिंदी होतं. ते अगदी लहानपणापासून द्यायची गरज नाही. हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर खूप आनंद झाला. कारण, मराठी भाषा ही आपली आहे आणि ती शिकलीच पाहिजे. आपण आईला 'माँ' असं म्हणत नाही. मी तर अगदी माझ्या आईला 'आये' अशी हाक म्हणतो. मला वाटतं आपण आपल्या भाषेतून व्यक्त होणं गरजेच आहे. बाकी इतर भाषाही नंतर शिकुयात की. फ्रेंच, रशियन या भाषाही आहेत. पण, सक्ती नको. जीआर रद्द झाल्यानंतर मनापासून आनंद झालाय", असं त्यानं म्हटलं.

सिद्धार्थ जाधवच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'येरे येरे पैसा ३' चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव यांनी केले आहे. कलाकारांच्या यादीत सिद्धार्थ जाधवसह संजय नार्वेकर, उमेश कामत, तेजस्विनी पंडित, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, नागेश भोसले, वनिता खरात, जयवंत वाडकर यांच्यासह आणखी काही चर्चित चेहरे दिसणार आहेत. हा सिनेमा १८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

टॅग्स :सिद्धार्थ जाधवहिंदीराजकारणमराठीसेलिब्रिटी