संपूर्ण महाराष्ट्राचा 'सिद्धू' म्हणजेच सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) हा अस्सल मराठी माणूस असला तरी त्याने मराठीबरोबरच हिंदी कलाविश्व गाजवले आहे. अभिनयासोबत आपल्या स्टाईलने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. कॉलेज जीवनापासून अभिनयाची सुरुवात केलेला सिद्धार्थ आज सिनेइंडस्ट्रीतील आघाडीचा अभिनेता आहे. सध्या सिद्धू स्टार प्रवाह वाहिनीवरील आता होऊ दे धिंगाणा शोमध्ये सूत्रसंचालन करताना दिसत आहे. दरम्यान आता त्याला धिंगाणेबाज परफॉर्मर म्हणून त्याला कार बक्षीस मिळाली आहे.
सिद्धार्थ जाधव याने इंस्टाग्रामवर गाडीच्या पूजेचा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, #आपलासिध्दू. न मागताच मिळाले आज खूप काही.. स्टार प्रवाह, श्री प्रसाद क्षिरसागर, सुमेध म्हात्रे, फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी आणि सतीश राजवाडे सर यांचा आभारी आहे. मराठी टेलिव्हीजनच्या इतिहासामधला मी पहिला कलाकार असेन ज्याला बक्षीस म्हणून कार मिळाली आहे. खूप भारी फिलिंग. कारण खूप वर्षांपूर्वी "इंडियन आयडॉल" च्या फायनल नंतर अभिजित सावंतला होंडा सिटी मिळाली होती.
तो पुढे म्हणाला की, अन ते बघून खूप आनंद झाला होता. आणि आज त्याच धर्तीवर महाराष्ट्राच्या नं १ चॅनेल वर "आता होऊ दे धिंगाणा" सारखा शो होस्ट करायला मिळणं आणि त्याच शो वर मायबाप रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम करणं आणि त्याची जी काय पोचपावती म्हणून, धिंगाणेबाज परफॉर्मर म्हणून मला ही गाडी बक्षीस म्हणून मिळणं हे सगळंच स्वप्नवत आहे. खूप मस्त वाटतंय. आता होऊ दे धिंगाणा..!
वर्कफ्रंट
अभिनेता सिद्धार्थ जाधव सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. आता तो लवकरच नवरा माझा नवसाचा २मध्ये दिसणार आहे. तसेच तो येरे येरे पैसा ३मध्येही झळकणार आहे.