धक्कादायक : ‘दशक्रिया’ चित्रपटाचा गल्ला थेट ‘ज्युली-२’ च्या खात्यात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 21:43 IST
वादाच्या भोवºयात सापडलेल्या ‘दशक्रिया’ या चित्रपटाबद्दल एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. होय, या चित्रपटाच्या नावे चक्क हिंदी चित्रपटाचे ...
धक्कादायक : ‘दशक्रिया’ चित्रपटाचा गल्ला थेट ‘ज्युली-२’ च्या खात्यात?
वादाच्या भोवºयात सापडलेल्या ‘दशक्रिया’ या चित्रपटाबद्दल एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. होय, या चित्रपटाच्या नावे चक्क हिंदी चित्रपटाचे तिकीट प्रेक्षकांना दिले जात असून, मराठी चित्रपटाचा गल्ला थेट हिंदी चित्रपटांना जात असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार मुंबईतील नेरूळमध्ये उघडकीस आला आहे. एक प्रेक्षक ‘दशक्रिया’ हा चित्रपट बघण्यासाठी गेला असता, त्याला चक्क ‘ज्युली-२’चे तिकीट देण्यात आले. त्यामुळे ‘दशक्रिया’ चित्रपटाच्या तिकिटासाठी खर्च केलेली रक्कम थेट ‘ज्युली-२’ या चित्रपटाच्या गल्ल्यात जमा झाल्याने विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. सेल्स टॅक्सचे उपआयुक्त नेरूळच्या मॅक्स मल्टिप्लेक्समध्ये ‘दशक्रिया’ हा चित्रपट बघण्यासाठी गेले होते. त्यांनी रीतसर रात्री ९ वाजेच्या शोचे ‘दशक्रिया’ या चित्रपटाचे तिकीटही खरेदी केले. परंतु त्यांना ‘ज्युली-२’चे तिकीट देण्यात आले. विशेष म्हणजे, याच तिकिटावर त्यांना ‘दशक्रिया’ हा चित्रपट बघण्यासाठी प्रवेशही दिला. सुरुवातीला त्यांच्या हा प्रकार लक्षात आला नाही. मात्र जेव्हा मध्यंतरात त्यांनी सहज तिकीट बघितले तेव्हा त्यांना ‘ज्युली-२’ या चित्रपटाचे तिकीट दिल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच याबाबतची विचारणा करण्यासाठी तिकीट काउंटर गाठले. परंतु तोपर्यंत काउंटर बंद झाले होते. त्यांनी याविषयी आणखी चौकशी केली असता, कोणाकडूनही फारसे समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मात्र यापूर्वीही असे प्रकार घडत असल्याची शंका सध्या उपस्थित केली जात आहे. एकूणच मराठी चित्रपटाच्या नावे जमा होणारा कोट्यवधी रुपयांचा गल्ला थेट हिंदी चित्रपटाच्या नावे जमा होत असल्याची शंका यानिमित्ताने उपस्थित केली जात आहे. आता या प्रकरणी मराठी इंडस्ट्रीकडून काय भूमिका घेतली जाईल याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.