शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग फेम स्नेहा वाघ झळकणार मराठी चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2017 16:16 IST
स्नेहा वाघने मराठी मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. स्नेहाने अधुरी एक कहानी या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर आगमन केले. पहिल्याच ...
शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग फेम स्नेहा वाघ झळकणार मराठी चित्रपटात
स्नेहा वाघने मराठी मालिकेपासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. स्नेहाने अधुरी एक कहानी या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर आगमन केले. पहिल्याच मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर काटा रूते कोणाला या मालिकेने तिला प्रसिद्धीझोतात आणले. या मालिकेनंतर तिने अनेक नाटक आणि मराठी चित्रपटांमध्ये काम केले. मराठीत यश मिळवल्यानंतर ती हिंदी इंडस्ट्रीकडे वळली. ज्योती या हिंदी मालिकेत तिने प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने एक वीर की अर्दास... वीरा या मालिकेत काम केले. या मालिकेमुळे तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आता ती शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग या भव्य ऐतिहासिक मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती रणजितसिंग यांची आई राज कौर यांची भूमिका साकारत आहे. या मालिकेसाठी ती सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. या मालिकेत तिची वेशभूषा खूपच वेगळी आहे. या मालिकेत ती अनेक किलोच्या कपड्यांमध्ये आणि दागिन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच ही ऐतिहासिक मालिका असल्याने या मालिकेतील भाषेचा लहेजादेखील खूपच वेगळा आहे. या मालिकेत तिची देहबोलीदेखील खूप वेगळी आहे. या सगळ्यामुळे तिला या भूमिकेचा चांगलाच अभ्यास करावा लागत आहे. हिंदी मालिकांकडे वळल्यानंतर स्नेहाला मराठी चित्रपट, मालिकेला वेळ देता आला नव्हता. पण आता ती एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. दरम्यानच्या काळात तिने एका मराठी चित्रपटाचे चित्रीकरण केले होते आणि हा चित्रपट लवकरच प्रदर्शितदेखील होणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबतच संदीप पाठक, मोहन आगाशे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.