Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर्चीने कधीच नाही केले हे काम, लवकरच पूर्ण करायची ही इच्छा....!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 08:00 IST

आर्ची अर्थात रिंकूलाही मराठी नाटक आणि रंगभूमीची भुरळ पडलीय. तिने मराठी नाटक लवकरच पाहावं आणि एखाद्या मराठी नाटकातून रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची जादू दाखवावी अशीच इच्छा तिच्या फॅन्सची असेल. 

'सैराट' सिनेमाने रिंकूला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही दिलं. रसिकांनी तर भरभरुन प्रेम दिलंच, शिवाय राष्ट्रीय पुरस्कारातही रिंकूनं बाजी मारली. सध्या रिंकूच्या दुसऱ्या सिनेमाची प्रतीक्षा असली तरी ती कायमच आर्ची म्हणून रसिकांच्या काळजावर अधिराज्य गाजवेल. मूळची अकलूजची असलेल्या रिंकूनं आपल्या अभिनयाने साऱ्यांनाच तोंडात बोटं घालायला लावली आहेत. असं असलं तरी आर्चीची एक अशी गोष्ट आहे जी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. बालपणी अकलूजमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये रिंकूने सहभाग घेतला. यांत गाणी किंवा नृत्याच्या कार्यक्रमाचा समावेश होता. मात्र आजवर रिंकूने कोणतंही नाटक पाहिलेलं नाही. अकलूजमध्ये कोणत्याही नाटकाच्या स्पर्धा किंवा नाटकांचं आयोजन करण्यात आलं नसल्याने ती नाटकांपासून आजवर दूरच आहे. त्यामुळेच की काय तिने नाटकात कधी सहभाग घेतला नाही किंवा नाटक पाहिलंही नाही. 

मात्र आता एक कलाकार म्हणून नाटक पाहण्याची रिंकूची इच्छा आहे. नाटक हा प्रकार जाणून घेण्याची तिला उत्सुकता आहे. लवकरच मराठी नाटक पाहण्याची इच्छाही तिने व्यक्त केली आहे. मराठी रंगभूमीने अनेक दिग्गज कलाकार दिले आहेत. रंगभूमी आणि नाटकातील अभिनयाने या कलाकाराच्या अभिनय कौशल्य आणखी समृद्ध केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनाही मराठी नाटक आणि रंगभूमीने मोहिनी घातली आहे. मराठी रंगभूमीवर काम केलेल्या कलाकारांच्या अभिनयात वेगळीच ताकद असते. त्यामुळेच आर्ची अर्थात रिंकूलाही मराठी नाटक आणि रंगभूमीची भुरळ पडलीय. तिने मराठी नाटक लवकरच पाहावं आणि एखाद्या मराठी नाटकातून रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची जादू दाखवावी अशीच इच्छा तिच्या फॅन्सची असेल. 

'कागर' सिनेमामधील रिंकूच्या लूकची यापूर्वी बरीच चर्चा झाली होती. तिने या सिनेमासाठी बरेचसे वजन घटवले आहे. याबाबत अनेक चर्चांना उधाण आले होते. सर्वांना तिने 'कागर' सिनेमासाठी वजन घटवले असे वाटत असले तरी या वजनाच्या प्रक्रियेसाठी फार पूर्वीपासूनच मी तयारी सुरू केली होती, असे रिंकूने सांगितले. रिंकूला नृत्य फार आवडते. लहानपणापासून नृत्य ही रिंकूची आवड आहे. आगामी 'कागर'मध्ये तिचे नृत्यसुध्दा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 'सैराट'नंतर रिंकूला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. 

टॅग्स :रिंकू राजगुरू