Join us  

सई ताम्हणकरने या कारणामुळे दिले नेटिझन्सना सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 1:45 PM

सईने मीटू या मोहिमेवर आपले मत व्यक्त केल्याचे काही नेटिझन्सना आवडलेले नाहीये. तिच्या मतप्रदर्शनावर अनेकांनी तिला पुण्यातील एका जुन्या प्रकरणाची आठवण करून दिली आहे.

टेलिव्हिजन आणि बॉलिवूडच्या जगतात संस्कारी बाबू अशी प्रतिमा असणारे अभिनेते आलोकनाथ यांच्यावर ‘तारा’ या लोकप्रिय मालिकेच्या निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. त्यानंतर अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर आलोक नाथ यांच्याविरोधात तीव्र राग व्यक्त केला. त्यात मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर हिनेदेखील सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे.

सई ताम्हणकरने ट्विटरवर आलोकनाथ यांना उद्देशून लिहिले की, 'तुम्ही कधीच शांततापूर्ण आयुष्य जगू शकणार नाही. तुम्ही नरकात सडणार,' अशा शब्दांत तिने प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर  काहीच दिवसांत सईने नाना-तनुश्री वादावर आपले मत नोंदवले होते. तिने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, नाना पाटेकर यांच्यावर तनुश्रीने जे काही आरोप केले आहेत, ते ऐकून मला नक्कीच धक्का बसला आहे. तिच्या आरोपात तथ्य असल्यास नाना पाटेकर यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे असे मला नक्कीच वाटते. 

पण सईने मीटू या मोहिमेवर आपले मत व्यक्त केल्याचे काही नेटिझन्सना आवडलेले नाहीये. तिच्या मतप्रदर्शनावर अनेकांनी तिला पुण्यातील एका जुन्या प्रकरणाची आठवण करून दिली आहे. 2011 साली पुण्यातील कोथरूड भागातील निलांबरी सोसायटीमध्ये काही मराठी कलाकारांनी दारू पिऊन धिंगाणा घातला होता. तसेच स्थानिकांना शिवीगाळ केली होती. यामध्ये सौरभ देशमुख, अजिंक्य खांबेकर, अभिषेक शेट्टी, अमेय गोसावी, श्रीरंग गोडबोले यांचा मुलगा सुरूद गोडबोले, सई ताम्हणकर यांचा समावेश होता. त्यावेळी सर्व पुरुषांना पोलिसांनी अटक केली होती. घटनास्थळी महिला पोलिस नसल्याने सई आणि तिच्यासोबत असलेल्या आणखी काही मुलींवर कारवाई करता आली नव्हती. नेटिझन्सने केवळ या प्रकरणाची सईला आठवणच करून दिली नाही तर तिला दारू पिऊन धिंगाणा घालणारी अभिनेत्री असेही सुनावले. यावर सईने देखील सडेतोड उत्तर दिले. 

सईने ट्वीट करून लिहिले आहे की, मित्रा त्या पेक्षा महत्त्वाचे काही तरी घडू पाहतंय इथे असो... ते समजण्याची कुवत वा मानसिक पातळी तुझी नाही. देव तुझे भलो करो...    

टॅग्स :सई ताम्हणकरआलोकनाथनाना पाटेकर