Join us
Daily Top 2Weekly Top 5

बबनच्या दर्जेदार गाण्यांवर असा चढला सुमधुर संगीताचा 'साज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2018 10:09 IST

यशस्वी चित्रपटाच्या मागे त्याचे उत्कृष्ट कथानक, दिग्दर्शकीय कौशल्य आणि दर्जेदार निर्मितीचा मोठा हातभार असतो, मात्र त्यासोबतच सिनेमा कमी वेळेत ...

यशस्वी चित्रपटाच्या मागे त्याचे उत्कृष्ट कथानक, दिग्दर्शकीय कौशल्य आणि दर्जेदार निर्मितीचा मोठा हातभार असतो, मात्र त्यासोबतच सिनेमा कमी वेळेत जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यातील गाण्यांचेदेखील महत्वाचे योगदान असते. त्यामुळेच तर, प्रत्येक चित्रपटात गाण्यांवर विशेष मेहनत घेतली जाते. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट 'ख्वाडा' फेम दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे लिखित आणि दिग्दर्शित आगामी 'बबन' या सिनेमात असाच एक यशस्वी प्रयत्न केलेला दिसून येतो. द फोक कोनफ्लूअन्स इंटरtटेंटमेंट प्रस्तुत आणि चित्राक्ष फिल्म्स निर्मित हा सिनेमा येत्या २३ मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.  या सिनेमातील सर्व गाणी सध्या सोशल नेट्वर्किंग साईटवर गाजत असून, या गाण्यांमुळे 'बबन' सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच मोठी प्रसिद्धी होत असल्याचे दिसून येते. 'बबन' सिनेमातील गाण्यांवर संगीताचा 'साज' चढवणा-या व्यक्तींमध्ये ओंकार स्वरूप, हर्षित अभिराज आणि सारंग कुलकर्णी या संगीतक्षेत्रातील कलाकारांचा महत्वाचा हात आहे.  
बबनच्या या म्युझिकल प्रवासाबद्दल सांगताना संगीत दिग्दर्शक हर्षित अभिराज सांगतात कि,  दिग्दर्शक भाऊराव कर्‍हाडेंशी ओळख होण्यास माझं ‘दूरच्या रानात...’ हे गाणं कारणीभूत ठरलं. ‘बबन’साठी त्यांना उत्कृष्ट मेलडी असलेली गाणी हवी होती. त्यानुसार आमच्या बर्‍याच बैठका झाल्या. अगदी आकडाच सांगायचा झाला तर आम्ही ३०-३५ बैठका घेतल्या आणि त्यामध्ये ज्या काही चाली मी त्यांना ऐकवल्या होत्या, त्यामधून काही मोजक्याच चाली निवडल्या. त्यातून मग पुढचा प्रवास सुरू झाला. ‘टक लावून बघतोया श्रावण महिना’ आणि ‘जगण्याला पंख फुटले’ या गाण्यांच्या चाली भाऊरावांना आवडल्या. ही दोन्ही गाणी डॉ. विनायक पवार यांनी लिहिली असून, या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी ‘यशराज’चा स्टुडिओदेखील त्यांनी मला उपलब्ध करून दिला.' बबन सिनेमातील  अन्वेषा दासगुप्ता हिच्या आवाजातील ‘श्रावण महिना’ या गाण्यात व्हायोलिन वाद्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करण्यात आला असल्याचे देखील त्यांनी पुढे सांगितले. शिवाय सध्या मोठ्या प्रमाणात गाजत असलेले ‘जगण्याला पंख फुटले’ हे अन्वेषा आणि ओंकारप्रसादच्या आवाजातील गाणे लोकांचा तोंडी रुळले आहे. तसेच ओंकारस्वरूप याने देखील 'बबन' च्या सुरेल आठवणी ताज्या करताना. 'साज ह्यो तुझा' आणि 'सपान भुर्र झालं' या गाण्यांचा अनुभव सांगितला. सुहास मुंडे यांच्या काही कविता चाली लावण्यासाठी मला दिल्या होत्या.  त्यापैकी ‘साज ह्यो तुझा’ आणि ‘सपान पुरं झालं’ या कवितांची चाल भाऊरावांना आवडली. जवळपास एक वर्ष आमचं हे काम सुरू होतं. त्याआधी एक घटना अशी घडली होती की सुहासच्या कवितेला मी लावलेली चाल आणि माझा आवाजही भाऊरावांना आवडला होता. आणि ‘‘तुझा आवाज खूप सुंदर आहे. संगीताचं आपण पुढं पाहू. पण तुझ्या आवाजात आपण एक गाणं तरी रेकॉर्ड करू.’’ असे भाऊराव मला म्हणाले. आणि मी मूळचा गायक आणि नंतर संगीतकार बनलो'. भाऊरावांकडून माझ्या गायनासाठी मिळालेली ही दाद मला लाख मोलाची असल्याचे ओंकारस्वरूप पुढे सांगतो. बबन या सिनेमात त्याचा आवाज पहिल्यांदाच ‘साज ह्यो तुझा’ या गाण्यामधून रसिकांना ऐकायला मिळतो आहे. शिवाय बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे यांच्या आवाजाची जादू 'मोहराच्या दारावर' या गाण्यात पाहायला मिळणार आहे. सुनिधी आणि शाल्मलीचं परस्परांबरोबर एकत्र असलेलं हे पहिलंच गाणं असल्यामुळे, त्यांच्यासाठी देखील हे गाणे खूप खास आहे. मराठी भाषेतील शब्दांशी जुळवून घेत सुनिधीने जेव्हा या गाण्याचे रेकोर्डिंग केले तेव्हा. ‘‘या गाण्याची ताकद खूप मोठी आहे. खरं तर हे गाणं आशा भोसले यांनी गायला हवं. त्याच या अवघड गाण्याला न्याय देऊ शकतात.’’ असे मत तिने व्यक्त केले होते. तर शाल्मलीने या गाण्याबद्दल मत व्यक्त करताना ''मोहराच्या दारावर’ हे गाणं गायला खूप अवघड आहे. परंतु, ते गायला मला खूप आवडले असल्याचे सांगितले. शिवाय, या गाण्याच्या निमित्ताने शाल्मालीला लोकसंगीताचा एक वेगळाच जॉनर हाताळायलादेखील मिळाला. तसेच, वरील सर्व गाण्यांच्या रेकोर्डिंगवेळी जुन्या जाणकार वादकांची मदत घेण्यात आली असल्यामुळे 'बबन' सिनेमा केवळ मनोरंजनच नव्हे तर रसिकांना संगीतमय दुनियेची सुरेल सफर देखील घडवून आणेल हे नक्की !