Join us  

मराठी इंडस्ट्रीत होणार रोहित शेट्टीची दमदार एन्ट्री; संकेत देत म्हणाला,' शरद केळकरसोबत...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 12:39 PM

Rohit shetty: रोहित लवकरच करणार मराठी सिनेमा? वाचा तो नेमकं काय म्हणाला

गेल्या काही काळामध्ये कलाविश्वाच्या कक्षा चांगल्याच रुंदावल्या आहेत. त्यामुळे साऊथ, मराठी सिनेमा यांमधील अनेक कलाकार बॉलिवूडमध्ये काम करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे बॉलिवूड कलाकारही आता प्रादेशिक भाषेतील सिनेमांकडे त्यांचा मोर्चा वळवत आहेत. आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मराठी इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली आहे. यामध्येच आता बॉलिवूडचा धडाकेबाज दिग्दर्शक रोहित शेट्टी यानेही मराठी सिनेमा करण्याचे संकेत दिले आहेत.

बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टी (rohit shetty) याने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला विशेष मुलाखत दिली. त्याची  'इंडियन पोलीस फोर्स'ची  वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने त्याने मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याच्यासोबत शरद केळकर (sharad kelkar) , शिल्पा शेट्टी (shilpa shetty) आणि वैदेही परशुरामी (vaidehi parshurami) हे कलाकारही उपस्थित होते. मुलाखत सुरु असताना रोहितने मराठी कलाविश्वात पदार्पण करण्याचे संकेत दिले. ज्यामुळे उपस्थितांच्या नजरा त्याच्याकडे वळाल्या.

 या मुलाखतीमध्ये त्याने मराठी सिनेमा आणि मराठी इंडस्ट्री याविषयी भाष्य केलं. सोबतच लवकरच तो मराठी सिनेमाचं दिग्दर्शन करेल असंही त्याने सांगितलं. इतकंच नाही तर त्याच्या सिनेमात शरद केळकर असणार असंही तो म्हणाला.

"तुम्ही मराठी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहात, तर तुमच्या सिनेमात कोणते मराठी कलाकार असतील?" असा प्रश्न रोहित शेट्टीला विचारण्यात आला. त्यावर, ''कथा फायनल झाल्यानंतर तो विचार सुरु होईल. आता शरद माझ्या समोर आहे तर शरद नक्कीच असेल. पण, कथा काय आहे हे पाहूनच कलाकारांची निवड करेन", असं रोहितने उत्तर दिलं.

दरम्यान, रोहित शेट्टी दिग्दर्शित 'इंडियन पोलीस फोर्स' ही वेब सीरिज १९ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित झाली. या वेब सीरिजमध्ये शिल्पा शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहेत .शरद केळकर या सीरिजमध्ये RAW एजेंटच्या भूमिकेत आहे. 

टॅग्स :रोहित शेट्टीसिनेमाबॉलिवूडशरद केळकरवैदेही परशुरामीशिल्पा शेट्टी