रोहिणी हट्टंगडी पहिल्यांदाच झळकणार या बेवसीरिजमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2017 11:17 IST
मोठा पडदा असो किंवा मग छोटा पडदा... त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे रोहिणी हट्टंगडी घराघरात लोकप्रिय ठरल्या.'होणार सून मी या घरची' या ...
रोहिणी हट्टंगडी पहिल्यांदाच झळकणार या बेवसीरिजमध्ये
मोठा पडदा असो किंवा मग छोटा पडदा... त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळे रोहिणी हट्टंगडी घराघरात लोकप्रिय ठरल्या.'होणार सून मी या घरची' या मालिकेतली आईआजी असो किंवा मग 'सख्या रे' या मालिकेतील माँसाहेब असो त्यांच्या प्रत्येक भूमिकेला रसिकांनी आपलेस केलं.सिनेमा आणि मालिका गाजवल्यानंतर आता रोहिणी हट्टंगडी वेबसिरिजकडे वळल्या आहेत.पहिल्यांदाच एका वेबसिरीज मध्ये झळकणार आहेत.‘रिलेशन कनेक्शन’ या वेबसिरीज मधील ‘आजीची पोतडी’ या लघुकथेच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणार आहेत.आजकाल मोबाईल,सोशल मीडिया,व्हाॅट्सअॅपच्या जमान्यात संवाद कुठे तरी हरवत चालला आहे हे या कथेमध्ये ठळकपणे मांडण्यात आले आहे. रिलेशन म्हणजेच नातं.ते कोणासोबतही आणि कोणतंही असू शकतं. एखाद्या व्यक्तीशी,वस्तुशी,प्राण्याशी किंवा मग स्वतःशीही.कधी आपण प्रेमात पडतो, मैत्री निभावतो, कधी अनोळखी व्यक्ती अचानक आपलीशी वाटू लागते आणि कधी कधी तर एखादी निर्जीव वस्तू आपली सोबतीही होते. काही घटना, सुख दुःखाचे प्रसंग आपल्या आजूबाजूला, आपल्या सोबत घडतात. अशाच काही कथा 'रिलेशन कनेक्शन' या वेबसीरिजमध्ये पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये रोहिणी हट्टंगडीसह सारा श्रवण, तेजस्वी पाटील, नवीन प्रभाकर यांसारखे अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत.या लघुकथेचे दिग्दर्शन निलेश कुंजीर यांनी केले आहे.तर अभिनव पाठक हे “आजीची पोतडी” लघुकथेचे निर्माते आहेत. साध्या, सोप्या, हळुवार पण लोकांना भावणाऱ्या अशा कथा करायला मला नेहेमीच आवडत असल्याचे दिग्दर्शक निलेश कुंजीर यांनी सांगितले.सरळसाध्या आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अशाच कथा या वेबसीरिजमध्ये सामाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. 'आजीची पोतड' ही लघुकथा १ ऑगस्टपासून पाहता येणार आहे.