Join us  

Ved Marathi Movie : 'वेड' सिनेमात शेवटच्या सीनमध्ये मालगाडी का आहे ? रितेशनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 2:16 PM

'वेड'च्या शेवटच्या सीनमध्ये जिनिलिया नागपुरला जायला निघते. रेल्वे स्टेशनवरील तो सीन आहे जिथे सत्या आणि श्रावणी एकमेकांना प्रेमाची कबुली देतात.

Ved Marathi Movie : मराठीत चित्रपटसृष्टीत एका चित्रपटाचा सध्या बोलबाला आहे. २० दिवस झाले या सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अजुनही हा सिनेमा थांबण्याचे नावच घेत नाही. हे वाचूनच कळलंच असेल हा चित्रपट आहे 'वेड'. रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh) पहिलाच दिग्दर्शित केलेला आणि जिनिलियाचा (Genelia) हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. ज्यांनी सिनेमा बघितला त्यांना लक्षात येईल की 'वेड'च्या शेवटच्या सीनमध्ये जिनिलिया नागपुरला जायला निघते. रेल्वे स्टेशनवरील तो सीन आहे जिथे सत्या आणि श्रावणी एकमेकांना प्रेमाची कबुली देतात. पण त्या सीनमध्ये प्लॅटफॉर्मवर मालगाडी लागलेली दिसते. तुम्हालाही प्रश्न पडला असेलच की त्यात खरीखुरी रेल्वे न दाखवता मालगाडी का दाखवण्यात आली ? तर याचं उत्तर रितेशने दिलं आहे.

इनस्टाग्रामच्या लाईव्ह सेशनमध्ये रितेशने मालगाडीचा किस्सा सांगितला. तो म्हणाला, 'वेड सिनेमाच्या शूटिंगवेळी मध्येच लॉकडाऊन लागला. माझी आधी दाढी वाढलेली होती म्हणून मी दुसऱ्या भागाचं चित्रीकरण सुरुवातीला केलं.त्यानंतर दाढी काढून पहिला भाग चित्रीत करण्यास सुरुवात केली. मात्र तेव्हाच लॉकडाऊन जाहिर झाला.यावेळी रेल्वे प्रशासनाने चित्रीकरणावेळी केवळ १० च माणसांना परवानगी दिली.पण एक सीनही चित्रित करायला ११० माणसं असतात. त्यामुळे तेव्हा आम्ही ते चित्रीकरणच रद्द केलं.यानंतर लॉकडाऊन उघडल्यावर आम्ही पुन्हा तो सीन करायला गेलो. तेव्हा प्लॅटफॉर्मवर मालगाडी लागली होती. आम्ही सांगितलं आम्हाला मालगाडी नकोय. पण रेल्वे प्रशासन म्हणाले, पुढे प्लॅटफॉर्मवर काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे ही मालगाडी पुढचे ५ तास हलणार नाही. आता पाच तास थांबण्याइतका तर वेळच नव्हता. म्हणून आम्ही तो सीन तसाच शूट केला.'

रितेश पुढे म्हणाला, आता हा सीन बघून लोकं म्हणले असते की श्रावणी नागपूरला जाताना दाखवलं आहे मग मालगाडी का दिसत आहे. म्हणून आम्ही तो संवाद तेव्हा अॅड केला ज्यात श्रावणी सत्याला म्हणते, 'थांबावंच लागेल, मालगाडी आहेस ना.' असा तो मजेदार किस्सा रितेशने चाहत्यांसोबत शेअर केला. 

वेड ला मिळत असलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल रितेश आणि जिनिलियाने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. लवकरच सिनेमा ५० कोटींचा गल्ला पार करेल असं चित्र आहे. या यशामुळे भारावून जात आता वेड तुझा या गाण्याचं नवं व्हर्जन घेऊन येत असल्याची माहिती रितेशने दिली आहे. सत्या आणि श्रावणीचे हे रोमॅंटिक सॉंग असणार आहे.

टॅग्स :वेड चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजा