रस्त्यावरून फिरणारे भटके कुत्रे ही शहरी भागातील एक गंभीर समस्या बनलेले आहे. या भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले आहेत. तर अनेक लहान मुलं भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे रात्री अपरात्री आणि अगदी दिवसाढवळ्याही भटक्या कुत्र्यांचा उपद्रव असलेल्या भागातून लोकांना जीव मुठीत धरून जावं लागतं. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांविरोधात सक्त भूमिका घेतली आहे. तसेच रस्त्यावरून मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांना डॉग शेल्टर होममध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यावरुन अनेक श्वानप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान अभिनेत्री रिंकू राजगुरुने (Rinku Rajguru) कुत्र्याच्या पिल्लांसोबत क्युट व्हिडिओ शेअर केला आहे.
'सैराट' फेम 'आर्ची'ला म्हणजेच रिंकू राजगुरुला प्राण्यांचं वेड आहे. तिच्याकडे मांजर आहे जिच्यासोबत ती कायम व्हिडिओ, फोटो शेअर करत असते. तसंच रिंकूच्या गावीही अनेक मांजरी, कुत्र्याची पिल्लं आहेत. आता कोर्टाच्या आदेशाची चर्चा असतानाच रिंकूने एक गोड व्हिडिओ शेअर केला आहे. कित्येक क्युट puppies तिच्या मांडीवर खेळत आहेत. रिंकूही त्यांच्यासोबत एन्जॉय करत आहे. तिने व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले, "एकही शब्द न बोलता यांनी मला नि:स्वार्थी प्रेमाची भाषा शिकवली. प्राणीप्रेमी."
रिंकूच्या या व्हिडिओवर अनेकांनी हार्ट इमोजी कमेंट केल्या आहेत. तर काहींनी मात्र तिची चेष्टाही केली आहे. 'एखादा पिसाळलेला चावला की समजेल','हिच्या घरच्यांपैकी कोणाला काही झालं तर हिला कळेल' अशा कमेंट्स आल्या आहेत.
कोर्टाच्या निर्णयाविरोधात अनेक सेलिब्रिटी एकवटले आहेत. जान्हवी कपूर, वरुण धवन, जॉन अब्राहम, रवीना टंडन, सोफी चौधरीसह अनेक कलाकारांनी पोस्ट शेअर करत विरोध दर्शवला आहे.