सध्या संपूर्ण महाराष्ट्र वारीच्या गजरात दुमदुमला आहे. दरवर्षी होणारी पंढरीची वारी यंदाही उत्साहात सुरु आहे. रविवारी आषाढी एकादशी असून लाखो वारकरी पायी पंढरपूरकडे निघाले आहेत. टाळ-मृदुंगाचा गरज, फुगडी, वारीतलं रिंगण अशा अनेक गोष्टी बघायला मिळत आहे. 'सैराट'फेम आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुही (Rinku Rajguru) यंदा वारीत सहभागी झाली. तिच्यासोबत तिचे वडीलही होते. २० वर्षांनंतर ती वडिलांसोबत वारी करत आहे. याचाच अनुभव तिने मांडला आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरुने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. हिरवी नऊवारी साडी, नथ, केसात गजरा, गळ्यात टाळ, डोक्यावर तुळस अशा पारंपरिक पेहरावात ती वारीत चालताना दिसत आहे. वारकऱ्यांशी संवाद साधताना दिसत आहे. वडिलांसोबत तिने फुगडी खेळण्याचाही आनंद घेतला. वारकऱ्यांसोबत तिने छान वेळ घालवला.'जगात भारी पंढरीची वारी' असं ती शेवटी म्हणताना दिसते. रिंकूचे हे सर्व क्षण अतिशय सुंदररित्या कॅमेऱ्यात टिपले गेले आहेत.
या व्हिडिओला कॅप्शन देत लिहिले, "जय जय राम कृष्ण हरी...हा प्रवास माझ्यासाठी खूप खास होता. मी ४ वर्षांची असताना पहिल्यांदा बाबांसोबत वारी अनुभवली होती. आता २० वर्षांनंतर मी पुन्हा बाबांसोबत तेच क्षण अनुभवले. आपलं मूळ कधीच विसरु नये."
रिंकूच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंट्सच्या वर्षाव झाला आहे. तिच्या सुंदर हास्याचं आणि सौंदर्याचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे. 'लय भारी' म्हणत तिच्या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत.