Join us

लक्ष्याच्या 'झपाटलेला'मधील 'कुबड्या खवीस' आठवतोय ना! कमी वयात अभिनेत्याने जगाचा घेतला निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 13:02 IST

Bipin Varti: 'कुबड्या खविस'ची ही गाजलेली भूमिका बिपीन वर्टी यांनी साकारली होती. याशिवाय त्यांनी माझा छकुला सिनेमात गिधाड गॅंग मधला प्रमुख व्हिलन साकारला होता. फार कमी वयात या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला.

नव्वदच्या दशकात महेश कोठारे (Mahesh Kothare) यांचे बरेच चित्रपट सुपरहिट ठरले. त्यातीलच एका चित्रपट म्हणजे 'झपाटलेला' (Zapatlela Movie). महेश कोठारे दिग्दर्शित हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही रसिकांच्या मनात घर करून कायम आहेत. या चित्रपटातील लक्ष्या, महेश, तात्या विंचू, बाबा चमत्कार या पात्रांसोबतच कुबड्या खविस हे पात्र चांगलेच लोकप्रिय झाले होते. कुबड्या खविसची ही गाजलेली भूमिका बिपीन वर्टी (Bipin Varti) यांनी साकारली होती. याशिवाय त्यांनी माझा छकुला सिनेमात गिधाड गॅंग मधला प्रमुख व्हिलन साकारला होता. फार कमी वयात या अभिनेत्याने जगाचा निरोप घेतला.

बिपीन वर्टी अभिनेत्यासोबत निर्माते आणि दिग्दर्शक होते. बिपीन हे अभिनेते सचिन पिळगावकर यांचे सख्खे आतेभाऊ आहेत. या दोघांचं बालपण एकत्र गेलं. बिपीन यांनी सुरुवातीला पिळगावकर कुटुंबाच्या प्रोडक्शन कंपनी सांभाळली. नंतर सचिन पिळगावकर आणि बिपीन यांनी मिळून 'प्रथमेश फिल्म्स डिस्ट्रिब्युटर्स'च्या बॅनरखाली 'मायबाप' या चित्रपटावर काम केले. पण काही कारणांमुळे त्या दोघांमध्ये व्यावसायिक मतभेद झाले. 'खरा वारसदार' या चित्रपटापासून बिपीन यांनी निर्मिती आणि दिग्दर्शनाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी सचिन यांना चित्रपटाच्या पटकथेसाठी विनंती केली. मात्र, चित्रपटाच्या श्रेयनामावलीत सचिन यांचं नाव दिले नाही. त्यानंतर त्या दोघां वेगवेगळं काम करायला सुरुवात केली. मग बिपीन यांनी 'प्रथमेश फिल्म्स'ची सुरुवात केली. 'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट हिट झाल्यानंतर त्यांनी 'प्रथमेश फिल्म्स'साठी दिग्दर्शन करण्याची इच्छा सचिन पिळगावकर यांच्याजवळ व्यक्त केली. पण, पिळगावकर यांनी नकार दिला. 

अभिनेत्याला लागलेलं दारुचं व्यसन

बिपीन वर्टी यांनी शामल यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यांना मुलगा झाला पण तो गतिमंद होता. त्यामुळे बिपीन खूप खचले आणि त्यांनी डिप्रेशनमध्ये 'प्रथमेश फिल्म्स' ही कंपनी बंद केली. त्यानंतर ते दारूच्या आहारी गेले आणि अगदी कमी वयातच त्यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले.

टॅग्स :महेश कोठारेलक्ष्मीकांत बेर्डेसचिन पिळगांवकर