Join us

निर्माता अमोल कागणेची अशी असणार नवी इनिंग!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 09:02 IST

"मान्सून फुटबॉल"मध्ये अमोलसह अभिनेत्री सागरिका घाटगे, चित्रांशी रावत, विद्या माळवदे, डेलनाझ इराणी, प्रीतम कागणे, उषा नाईक अशी दमदार स्टारकास्ट आहे.

हलाल, लेथ जोशी, ३१ ऑक्टोबर, परफ्युम

अशा चित्रपटांसाठी अनेक पुरस्कार मिळवलेला निर्माता, सह दिग्दर्शक आणि प्रस्तुतकर्ता अमोल कागणे आता अभिनयात पदार्पण करत आहे. मिलिंद उके दिग्दर्शित "मान्सून फुटबॉल" या बहुचर्चित चित्रपटातून अमोल अभिनयाची इनिंग सुरू करत असून, तो गुजराती पतीची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

 

"मान्सून फुटबॉल"मध्ये अमोलसह अभिनेत्री सागरिका घाटगे, चित्रांशी रावत, विद्या माळवदे, डेलनाझ इराणी, प्रीतम कागणे, उषा नाईक अशी दमदार स्टारकास्ट आहे. या सगळ्या अभिनेत्री साडी नेसलली असतानाच फुटबॉल खेळताना दिसतील. गृहिणी झाल्यावर आपली पुसली गेलेली ओळख पुन्हा निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेला लढा या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपट नव्या वर्षात, जानेवारीमध्ये प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे. मान्सून फुटबॉल या चित्रपटासह अमोल बाबो, अहिल्या, झोलझाल, भोंगा, तुझं माझं अॅरेंज मॅरेज अशा चित्रपटातूनही अभिनेता म्हणून दिसणार आहे. निर्माता आणि प्रस्तुतकर्ता म्हणून आपला ठसा उमटवल्यानंतर अमोल अभिनेता म्हणूनही ओळख निर्माण करेल, यात शंका नाही.

 

पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून अमोलनं नाट्यशास्त्राचं शिक्षण घेतलं आहे. आतापर्यंत त्यांना २६ हून अधिक नाटकं आणि 4 चित्रपटांची निर्मिती केली आहे. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या भारत रंग महोत्सवात त्यानं नाटकही सादर केलं आहे. 

 

मान्सून फुटबॉल या चित्रपटातील भूमिका ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. अशा चांगल्या चित्रपटाचा एक भाग असणं माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आहे. माझ्या वाट्याला गुजराती व्यक्तीची भूमिका आली आहे. मी मराठी असल्याने ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. माझ्या मेकअप दादांकडून गुजराती शिकलो, लहेजा समजून घेतला. तसंच माझ्या अनेक गुजराती मित्रांबरोबर राहून वागणं-बोलणंही समजून घेतलं. या भूमिकेसाठी मी जवळपास सहा किलो वजन वाढवलं आहे,' असं अमोलनं सांगितलं. 

अमोल बरोबर काम करण्याबद्दल दिग्दर्शक मिलिंद उके म्हणाले, 'अमोल हा संवेदनशील अभिनेता आहे. त्याला दिलेली भूमिका जरा अवघडच आहे. मात्र, अमोलनं या भूमिकेचा अभ्यास केला, त्यासाठी आवश्यक असलेली तयारी केली, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यानं भूमिकेवर केलेल्या कामामुळे त्यानं प्रत्येक प्रसंग ताकदीनं सादर केला. प्रेक्षकांना त्याचा हा अभ्यासू अभिनय नक्कीच आवडेल आणि लक्षात राहील याची मला पूर्ण खात्री आहे.'