Join us

५ हजार ऑडिशन दिल्या पण एकही टीव्ही जाहिरात मिळाली नाही...; प्रसाद ओकने बोलून दाखवली खंत

By कोमल खांबे | Updated: September 17, 2025 11:15 IST

प्रसादने मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांमध्येही विविधांगी भूमिका साकारल्या. पण, त्याला आजपर्यंत एकही टीव्ही जाहिरात मिळाली नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रसाद ओकने ही खंत बोलून दाखवली. 

प्रसाद ओक हा मराठीतील हरहुन्नरी अभिनेता. अत्यंत मेहनत आणि टॅलेंटच्या जोरावर प्रसादने सिनेसृष्टीत नाव कमावलं. एक अभिनेता असण्यासोबतच प्रसाद उत्तम दिग्दर्शकही आहे. प्रसादचं दिग्दर्शन असलेला आणि त्याची मुख्य भूमिका असलेला वडापाव हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता म्हणून हा प्रसादचा १००वा सिनेमा आहे. प्रसादने मराठी सिनेमा, नाटक आणि मालिकांमध्येही विविधांगी भूमिका साकारल्या. पण, त्याला आजपर्यंत एकही टीव्ही जाहिरात मिळाली नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत प्रसाद ओकने ही खंत बोलून दाखवली. 

'वडापाव' सिनेमाच्या निमित्ताने प्रसाद ओकने एबीपी माझा वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत प्रसाद म्हणाला, "किती मालिका, चित्रपट, व्यावसायिक नाटके केली याचा संपूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे आहे. या सगळ्यात आजपर्यंत एकही कमर्शियल जाहिरात मला मिळालेली नाही. मी सांगतोय ते कदाचित खोटं वाटेल पण मी जाहिरातीसाठी जवळपास ५-६ हजार ऑडिशन्स दिल्या आहेत. पण मला एकही जाहिरात अद्याप मिळालेली नाही. बाकी प्रिंट जाहिरात किंवा बाकी सगळ्या जाहिराती केल्या आहेत. पण टेलिव्हिजन कमर्शियल ज्याला आपण म्हणतो तशी एकही जाहिरात अजून मिळालेली नाही. मी वाट बघतोय बघुया लवकरच मिळेल".

दरम्यान, प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडापाव' हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अभिनय बेर्डे, रितिका श्रोत्री, गौरी नलावडे, सविता प्रभुणे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर अशी स्टारकास्ट आहे. नुकताच सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. २ ऑक्टोबरपासून 'वडापाव' सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. 

टॅग्स :प्रसाद ओक मराठी अभिनेतासिनेमा