अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरा आहे. नुकतीच ती 'बाई गं' आणि 'चिकी चिकी बुबूम बुम' सिनेमांमध्ये दिसली. तर आता तिने चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे. प्रार्थना तिचा नवरा अभिषेक जावकरसोबत काम करणार आहे. आगामी सिनेमात प्रार्थना अभिनय करणार असून अभिषेक दिग्दर्शन करणार आहे. नवऱ्यासोबतचं ड्रीम कोलॅब असं तिने म्हटलं आहे.
प्रार्थना बेहेरचा नवरा अभिषेक जावकर हा निर्माता आहे. त्याचं स्वत:चं रेड बल्ब स्टुडिओ आहे. आता या प्रोडक्शन हाऊसअंतर्गत अभिषेक आगामी सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहे. याआधी अभिषेकने काही सिनेमे दिग्दर्शित केले आहेत. मात्र आता पहिल्यांदाच त्याच्या सिनेमात प्रार्थना बेहेरे अभिनय करणार आहे. प्रार्थना नवऱ्यासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. तिने मुहुर्ताचे फोटो शेअर करत लिहिले, "नवीन भूमिकेत एकत्र पाऊल ठेवत आहोत. मी अभिनेत्री तर अभिषेक दिग्दर्शक. नवऱ्यासोबत ड्रीम कोलॅबोरेशन. तुमचं प्रेम आणि प्रार्थना सोबत असूद्या."
प्रार्थनाच्या या पोस्टवर इंडस्ट्रीतील इतर सेलिब्रिटींनी आणि मित्रपरिवारांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. प्रार्थना पहिल्यांदाच नवऱ्याच्या दिग्दर्शनाखाली काम करणार आहे. त्यांच्या या सिनेमाचं नाव त्यांनी अजून सांगितलेलं नाही. याआधी अभिषेक जावकरने २०१६ साली आलेला'मिसिंग ऑन अ वीकेंड' सिनेमा दिग्दर्शित केला होता. तसंच त्याने अनेक सिनेमांची निर्मिती केली आहे.