Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो...! लॉकडाउनमध्ये प्रणव रावराणे घालणारेय 'कॉमेडीचा राडा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 15:19 IST

जाणून घ्या प्रणव रावराणेच्या कॉमेडीचा राडाबद्दल

जगभरात कोरोनाने थैमान मांडले असून भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे सध्या देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे सगळेच जण घरामध्ये बंद आहेत. अशा परिस्थितीत लोकांचे मनोरंजन करण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता प्रणव रावराणे सज्ज झाला आहे. तो हंगामा प्ले या प्लॅटफॉर्मवर ‘कॉमेडीचा राडा’ हा स्टँडअप कॉमेडी शो घेऊन आला आहे. या शोमध्ये 10 एपिसोड असून त्यात एकूण 21 उदयोन्मुख कॉमेडियन प्रेक्षकांना भिडतील अशा ताज्या, समकालीन वैविध्यपूर्ण विषयांवरील एक्ट सादर करताना दिसणार आहेत. प्रणव रावराणेचे सूत्रसंचालन असलेल्या ‘कॉमेडीचा राडा’ या शोची निर्मिती आणि कलाकृती कॅफेमराठीची आहे.

या शोबद्दल प्रणव रावराणे म्हणाला, “मी या शोचा होस्ट आहे याचा मला आनंद आहे. महाराष्ट्रात प्रचंड गुणवत्ता असून हंगामा प्ले आणि कॅफेमराठीसारखे प्लॅटफॉर्म प्रादेशिक विनोदवीरांना प्रोत्साहन देण्यासाठी एकत्र येत आहेत, ही फार दिलासादायक बाब आहे. मला या शोमध्ये काम करताना जेवढा आनंद झाला, तेवढाच आनंद प्रेक्षकांना तो पाहताना मिळेल, याची मला खात्री आहे.”

रामदास टेकाळे, निशांत अजबेले, साईश गोटेकर, आकाश खेडकर, अक्षय कोकणे, चिरंतन लोणकर, स्वप्नील जाधव, योगेश खेडकर, मंदार पाटील, स्पंदन आंबेकर, तेजस घाडीगावकर, किशोर साळुंके, श्रीराम पारवे, प्रशांत वाकोडे, विनय नाटेकर, सुकेशिनी वाघमारे, प्रशांत मनोरे, सचिन भिलारे, आनंद कुलकर्णी, विलास पांचाळ आणि आदित्य सावंत या विनोदवीरांनी कॉमेडीचा राडामध्ये सहभाग घेतला आहे.

कॉमेडीचा राडा आता हंगामा प्ले आणि भागीदार नेटवर्क्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या