अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) चाहतावर्ग खूप मोठा आहे. प्राजू प्राजू म्हणत अनेक जण तिच्यावरचं प्रेम व्यक्त करतात. सोशल मीडियावरील तिच्या फोटोंखाली तर अनेक जण हमखास तिला प्रपोज करतात. महाराष्ट्रभर प्राजक्ताची कमालीची क्रेझ आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रेमध्येही तिची हसण्याची स्टाईल, वाह दादा वाह म्हणण्याची स्टाईल यावर चाहते फिदा होतात. नुकतीच प्राजक्ताने एका मराठी सिनेमाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली. यावेळी नक्की काय घडलं पाहा.
संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा ३' सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. सिनेमाच्या स्क्रीनिंगला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारही आले होते. यावेळी प्राजक्ता माळीही पोहोचली. प्रिंटेड शॉर्ट वनपीसमध्ये ती सुंदर दिसत होती. थिएटरबाहेर कॅमेऱ्यासमोर पोज दिल्यानंतर ती लिफ्टमध्ये गेली. तोच एक व्यक्ती आला. त्याला प्राजक्तासोबत फोटो हवा होता. प्राजक्ताने लिफ्टचं बटन दाबलं तेव्हा दरवाजा बंद होणारच होता. तोच त्या व्यक्तीने दरवाजाला हात लावून लिफ्ट थांबवली. नंतर प्राजक्ताही दार बंद होऊ नये म्हणून लिफ्टच्या एन्ट्रीला उभी राहिली. मग त्या व्यक्तीने फोटो काढला. प्राजक्ताचा चाहत्यासोबतचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
प्राजक्ताचा हा क्रेझ फॅन मोमेंट पाहून नेटकऱ्यांनी त्या व्यक्तीची खिल्ली उडवली आहे. तर दुसरीकडे प्राजक्ताचं कौतुक होत आहे. तिने कोणतेही आढेवेढे न घेता, बडेजाव न दाखवता त्याला फोटो दिला. प्राजक्ताच्या समयसूचकतेचं आता चाहते कौतुक करत आहेत.
प्राजक्ता शेवटची 'फुलवंती' सिनेमात दिसली. यात तिच्या अभिनयाचं, नृत्य कौशल्याचं खूप कौतुक झालं. सध्या ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' होस्ट करताना दिसत आहे.