Join us  

भन्नाट आहे अशोक-निवेदिता सराफ यांची लव्हस्टोरी; प्रथम कोणी प्रपोज केलं माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 2:17 PM

nivedita and ashok saraf: वयात 18 वर्षांचं अंतर ते कुटुंबाचा विरोध; अनेक अडथळे पार करत या जोडीने लग्न केलं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि तितकीच एव्हरग्रीन जोडी म्हणजे अशोक सराफ (ashok saraf) आणि निवेदिता सराफ (nivedita saraf) उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर या जोडीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. त्यामुळेच या जोडीला ऑनस्क्रीन जितकी लोकप्रियता मिळाली. तितकंच प्रेम त्यांना ऑफस्क्रीन सुद्धा मिळालं. विशेष म्हणजे या दोघांचं लव्हमॅरेज आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे. परंतु, त्यांचं सूत नेमकं जुळलं कसं, कोणी कोणाला पहिले प्रपोज केलं हे फारसं कोणाला माहित नाही. त्यामुळेच आज या जोडीची लव्हस्टोरी जाणून घेऊयात.

निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या वयात जवळपास १८ वर्षांचं अंतर आहे. परंतु, त्यांच्या प्रेमात वयाचा अडसर कधीच आला नाही. मात्र, ही जोडी एकाच क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे निवेदिता यांच्या कुटुंबियांनी या लग्नाला चांगलाच विरोध केला होता.

अशोक सराफ आणि निवेदिता यांची पहिली भेट एका नाटकाच्या प्रयोगावेळी झाली. त्यावेळी निवेदिता सराफ यांच्या वडिलांनी त्यांची आणि अशोक यांची ओळख करुन दिली होती. त्यानंतर काही वर्षांनी निवेदिता सराफ यांनी अभिनेत्री म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यावेळी त्यांना अशोक सराफ यांच्यासोबत काम करायची संधी मिळाली.  विशेष म्हणजे सुरुवातीला त्यांची फक्त ओळख होती. त्यानंतर मग मैत्री झाली.

'या' सिनेमाच्या सेटवर फुललं दोघांमध्ये प्रेम

'नवरी मिळे नवऱ्याला' हा सिनेमा मराठी कलाविश्वात चांगलाच गाजला. याच सिनेमाच्या सेटवर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या मैत्रीचं हळूहळू प्रेमात रुपांतर झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांना प्रपोज केल्याचं म्हटलं जातं.

'या' कारणामुळे निवेदिताच्या घरातल्यांचा होता लग्नाला विरोध

निवेदिता आणि अशोक यांचं नातं अभिनेत्रीच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं. आपल्या मुलीने सिनेइंडस्ट्रीमधील व्यक्तीशी लग्न करु नये असं त्यांचं मत होतं. परंतु, निवेदिता त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या. त्यामुळे त्यांच्या हट्टापुढे कुटुंबियांना नमतं घ्यावं लागलं.

गोव्यात पार पडला अशोक-निवेदिताचा लग्नसोहळा

गोव्यातील प्रसिद्ध देवस्थान मंगेशीच्या देवळात या जोडीचा विवाह सोहळा संपन्न झाला. लग्नानंतर वैवाहिक आयुष्यासाठी आणि मुलाच्या संगोपनासाठी निवेदिता सराफ यांनी काही काळ इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. मात्र, त्यांचा मुलगा अनिकेत मोठा झाल्यानंतर त्या पुन्हा अभिनय क्षेत्रात सक्रीय झाल्या. सध्या त्या छोट्या पडद्यावर झळकत आहेत. 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेनंतर त्या 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत काम करताना दिसून येत आहेत.

टॅग्स :अशोक सराफनिवेदिता सराफसेलिब्रिटीसिनेमा