Join us

रूपेरी पडद्यावर अवतरणार ‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2018 06:00 IST

निसर्गरम्य माथेरानमध्ये राहणाऱ्या घोडेस्वार बाबू पवार त्याची पत्नी, मुलगा चिनू, मुलगी तेजू यांच्या चौकोनी कुटुंबात ‘व्हॅनिला’चं आगमन होतं. या कुटुंबाची ‘व्हॅनिला’ सोबतच्या प्रेमाची गोष्ट या सिनेमातून पहायला मिळणार आहे.

‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अँण्ड चॉकलेट’ म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं...पण जरा थांबा...! कारण ही काही आईस्क्रीमची फ्लेवर्स नाहीत तर हे आहे आगामी मराठी सिनेमाचं नाव..!! होय... ‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’ नावाचा एक गोड सिनेमा १६ नोव्हेंबरला तुमच्या भेटीला येतोय. आजवर तुम्ही मराठीत अनेक प्रेमकथा पहिल्या असतील ही पण एक प्रेमकथाच आहे पण दोन व्यक्तींमधील नव्हे तर एका मुलीची तिच्या लाडक्या ‘व्हॅनिला’ सोबतच्या प्रेमाची.

निसर्गरम्य माथेरानमध्ये राहणाऱ्या घोडेस्वार बाबू पवार त्याची पत्नी, मुलगा चिनू, मुलगी तेजू यांच्या चौकोनी कुटुंबात ‘व्हॅनिला’चं आगमन होतं. या कुटुंबाची ‘व्हॅनिला’ सोबतच्या प्रेमाची गोष्ट या सिनेमातून पहायला मिळणार आहे. ‘अआइई एन्टरटेंन्मेंट निर्मित’ ‘व्हॅनिला  स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’ या सिनेमाची निर्मिती गिरीश विश्वनाथ यांची आहे. कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व दिग्दर्शन अशी सगळी जबाबदारीही त्यांनीच सांभाळली आहे. माथेरानसारख्या नयनरम्य ठिकाणी चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण करणारा ‘व्हॅनिला  स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’ हा पहिलाच चित्रपट आहे.

‘व्हॅनिला स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’ या सिनेमाद्वारे जानकी पाठक ही नवोदित अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. यासोबत ज्येष्ठ अभिनेते रवी काळे, राजश्री निकम, राधिका देशपांडे, क्षितीज देशपांडे, विनोद जाधव आदि कलाकारांच्या भूमिका चित्रपटात आहेत. सिनेमाचे संकलन सागर भाटिया तर छायांकन सचिन खामकर यांचे आहे. संगीत शंतनू नंदन हेर्लेकर यांचे असून जावेद अली, उपग्ना पंड्या, ऋतुजा लाड यांचा स्वरसाज चित्रपटातील गाण्यांना लाभला आहे. सहदिग्दर्शन निलेश देशपांडे यांचे आहे. १६ नोव्हेंबरला ‘व्हॅनिला, स्ट्रॅाबेरी अॅण्ड चॉकलेट’ हा सिनेमा महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होईल.