Join us  

Marathi Cinema: कोन नाय कोन्चा सिनेमावरून वाद, महेश मांजरेकरांनी त्या दृश्यांबाबत स्पष्टिकरण देत घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 7:43 PM

Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha : समाजातील विविध माध्यमातून उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा मान राखून या चित्रपटाच्या प्रोमोमधील आक्षेपार्ह वाटणारी दृश्ये काढून टाकली असून, सुधारीत प्रोमो सर्वांना पाठवण्यात येईल, असे Mahesh Manjrekar यांनी म्हटले आहे.

मुंबई - शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या महेश मांजरेकर यांच्या कोन नाय कोन्चा या चित्रपटातील काही दृश्यांवरून कमालीचा वाद पेटला आहे. तसेच याविरोधात महिला आगोगापासून माहिती आणि प्रसारण मंत्रालयापर्यंत तक्रारी झाल्या आहेत. सोशल मीडियावरूनही या चित्रपटातील काही दृश्यांवर जोरदार टीका झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. समाजातील विविध माध्यमातून उमटणाऱ्या प्रतिक्रियांचा मान राखून या चित्रपटाच्या प्रोमोमधील आक्षेपार्ह वाटणारी दृश्ये काढून टाकली असून, सुधारीत प्रोमो सर्वांना पाठवण्यात येईल, असे महेश मांजरेकर यांनी म्हटले आहे.

याबाबत महेश मांजरेकर म्हणाले की, नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा या चित्रपटाचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीस आल्यानंतर समाजातील बऱ्याच स्तरामधून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हा चित्रपट १८ वर्षे वयोगटापुढील असल्याने सेन्सॉर बोर्डाने याला ए प्रमाणपत्र दिले आहे. या चित्रपटाच्या प्रोमोमधील काही दृश्यांवर समाजातील काही घटकांनी आक्षेप घेतला असला तरी कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू यामध्ये नव्हता. मात्र या प्रतिक्रियांचा मान राखत आम्ही या चित्रपटाच्या प्रोमोमधील आक्षेपार्ह वाटणारी दृश्ये काढून टाकली असून, सुधारीत प्रोमो सर्वांना पाठवण्यात येईल. तसेच जुना प्रोमो काढून नवीन प्रोमो प्रदर्शित करण्याची सूचना संबंधितांना देण्यात आली आहे, असे महेश मांजरेकर यांनी सांगितले. 

चित्रपटाच्या निर्मितीसंस्थेपासून लेखक-दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ असे आम्ही सर्वजण स्त्रियांचा मनापासून आदर करतो. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हेतू नाही. तसेच प्रोमोच्या माध्यमातून असा चुकीचा संदेश जाणार नाही, याची कटाक्षाने खबरदारी घेतली गेली होती. तरीही या चित्रपटाच्या प्रोमोमधून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही त्याबाबत मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आक्षेपार्ह दृश्ये केवळ प्रोमोमधूनच नाही तर चित्रपटामधूनही वगळण्यात आला आहे. तसेच सेंसॉरने ए सर्टिफिकेट दिल्यानंतरही जी दृश्ये संवेदनशील वाटतात तसेच भविष्यात अडचणीची ठरू शकतात, ती दृश्येही आम्ही वगळत आहोत. 

नाय वरण भात लोन्चा कोन नाय कोन्चा या चित्रपटाची प्रसिद्धी सुरू केल्यापासून हा चित्रपट केवळ प्रौढांसाठी आहे असे सांगण्यात येत आहे. जे प्रेक्षक यात दाखवण्यात आलेली वास्तवता समजून घेऊ शकतात. यातील गांभीर्य लक्षात घेऊ शकतात, अशा प्रेक्षकांनीच हा चित्रपट पाहावा, असी विनंतीही करण्यात आली होती. तसेच हा चित्रपट सर्वसामान्य चित्रपटांसारखा नसल्याचे आम्ही वारंवार सांगत आहोत, असेही महेश मांजरेकर म्हणाले.

नाय वरणभात लोन्चा, कोन नाय कोन्चा हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट शुक्रवार १४ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे. दरम्यान, या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर त्यातील भडक दृश्यांची चर्चा झाली होती. त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि एका महिलेची आक्षेपार्ह स्थितीमधील दृश्य दाखवण्यात आली होती. त्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाकडून माहिती प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली गेली होती.

टॅग्स :महेश मांजरेकर मराठीसिनेमाबॉलिवूड