मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये ‘कान्हा’ या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला. प्रताप सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या विहंग एंटरटेन्मेटची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अवधूत गुप्ते यांचं आहे. चित्रपटात वैभव तत्ववादी, गश्मीर महाजनी आणि गौरी नलावडे हे कलाकार मुख्य भूमिका आहेत.
या शानदार सोहळ्यात राजकीय नेत्यांमध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम, आमदार एकनाथ शिंदे, समाजवादी पक्षाचे माजी महासचिव अमर सिंह, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, कॉंग्रेस पक्षाचे विजय दर्डा, बाबा सिद्दीकी यांसह अनेक नेते, आमदार उपस्थित होते. बॉलिवडच्या मंडळींमध्ये ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र, संजय खान, जावेद जाफरी, अपूर्व अग्निहोत्री, रोनित रॉय, सचिन पिळगावकर, माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, गोदरेज उद्योग समुहाचे अदी गोदरेज यांचीही विशेष उपस्थिती होती.
“आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात आजवर विविध उपक्रम सक्षमपणे हाताळणारे प्रताप सरनाईक चित्रपट निर्मितीतूनही एक महत्त्वाचा सामाजिक विषय मांडत आहेत. ‘कान्हा’ चित्रपटातून दहिहंडीच्या विविध प्रश्नांचा उहापोह करण्यात येईल अशी अपेक्षा मला आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा आणि त्याला भरभरून यश मिळावे आणि या चित्रपटाने सर्व विक्रम मोडावे” अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘कान्हा’ चित्रपटाला दिल्या.
‘कान्हा’ या चित्रपटात एकूण सहा गाणी असून ती अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केली आहेत. यात कृष्णजन्माचं गाणं लिहिलय मंदार चोळकर व गायलंय सोनू कक्कर, वैशाली सामंत आणि अवधत गुप्ते यांनी, ‘गोपाळा रे गोपाळा’ हे अरविंद जगताप यांनी लिहिलेलं गीत ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आणि कैलाश खेर यांनी स्वरबद्ध केलंय. तर ‘मित्रा’ हे गोविंदाच्या भावना व्यक्त करणारं वैभव जोशीं यांचं गीत आदर्श शिंदे आणि रोहित राऊत यांनी गायलंय. तरूणाईत असलेली दहिहंडीच्या उत्साहाची झिंग मांडणारं ‘तू मार किक रे गोविंदा’ हे गीत अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर यांनी तर ‘रडायचं नाय आता चढायचं’ हे गाणं पूर्वेश सरनाईक आणि अवधूत गुप्ते यांनी गायलं आहे.
संगीत प्रकाशनाच्या या सोहळ्यात ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे निवेदक डॉ. निलेश साबळे आणि अभिनेते भाऊ कदम यांनी विनोदाचे रंग भरले. यावेळी या दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दहिहंडीच्या आठवणी जाणून घेत आपल्या खास शैलीत संवाद साधला.
दहिहंडीच्या उत्सवाचे विविध पैलू मांडणारा ‘कान्हा’ हा चित्रपट येत्या २६ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.