Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mukta Barve Birthday Special: लग्न कधी करणार यावर मुक्ता बर्वेने दिले होते असे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 12:23 IST

मुक्ता लग्न कधी करणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून लागली आहे.

ठळक मुद्देमी आज जितकी खुश आहे, त्यापेक्षा मला आनंदी ठेवणारा जोडीदार मिळेल, त्यावेळी मी लग्नाचा विचार करेन... मला ज्यावेळी एखादी व्यक्ती प्रचंड आवडेल. त्यावेळी मी नक्कीच लग्न करण्याचा विचार करेन. 

मुक्ता बर्वेचा आज म्हणजेच १७ मे ला वाढदिवस असून तिचा जन्म पुण्यातील आहे. मुक्ताच्या कुटुंबियातील कोणाचाच चित्रपटसृष्टीशी संबंध नसला तरी तिला शालेय जीवनापासूनच अभिनयाची आवड होती. ती शाळेत असतानाच अनेक नाटकांमध्ये काम करत असे. तिने पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर तिने ललित कला केंद्रात अभिनयाचे धडे गिरवले.  

मुक्ताने रंगभूमीवरून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आम्हाला वेगळे व्हायचेय हे तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीचेच नाटक खूप गाजले होते. त्यानंतर ती घडतंय बिघडतंय, पिंपळपान, आभाळमाया, श्रीयुत गंगाधर टिपरे यांसारख्या मालिकांमध्ये झळकली. अग्निहोत्र ही तिची मालिका तर खूप गाजली होती. या मालिकेतील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. छोट्या पडद्यावर मिळालेल्या यशानंतर ती चित्रपटांकडे वळली. तिने थांग, देहभान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतरचे जोगवा, डबल सीट, मुंबई-पुणे-मुंबई यांसारखे तिचे चित्रपट प्रचंड गाजले. आज मराठीतीत आघाडीची अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वेकडे पाहिले जाते. 

चित्रपटात व्यग्र असतानाही मुक्ताने एका लग्नाची दुसरी गोष्ट या मालिकेत काम केले होते. या मालिकेत स्वप्निल जोशी तिच्यासोबत झळकला होता. या मालिकेतील तिची भूमिका, स्वप्निलसोबतचे तिचे ट्युनिंग प्रेक्षकांना खूपच आवडले होते. मुक्ता आणि स्वप्निलच्या जोडीचा मुंबई पुणे मुंबई ३ चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटातील स्वप्निल आणि मुक्ताच्या केमिस्ट्रीची प्रचंड चर्चा झाली होती. 

मुक्ता लग्न कधी करणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना गेल्या कित्येक वर्षांपासून लागली आहे. मुंबई पुणे मुंबई ३ या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी मुक्ताने तिचे लग्नाबाबत काय मत आहे हे सांगितले होते. लग्न करण्याविषयी तुझे मत काय आहे असे तिला विचारले असता तिने सांगितले होते की, मी आज जितकी खुश आहे, त्यापेक्षा मला आनंदी ठेवणारा जोडीदार मिळेल, त्यावेळी मी लग्नाचा विचार करेन... मला ज्यावेळी एखादी व्यक्ती प्रचंड आवडेल. त्यावेळी मी नक्कीच लग्न करण्याचा विचार करेन. 

टॅग्स :मुक्ता बर्वे