Join us

​मिलिंद गुणाजी झळकणार शतिका - द अनड्रप्ट या लघुपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2017 15:16 IST

मिलिंद गुणाजीने त्याच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. त्याने मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. फरेब, ...

मिलिंद गुणाजीने त्याच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिका साकारल्या आहेत. त्याने मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे. फरेब, विरासत यांसारख्या चित्रपटातील त्याच्या भूमिकेसाठी त्याला अनेक पुरस्कार सोहळ्यात नामांकनदेखील मिळाले आहे. मिलिंद त्याच्या खलनायकी भूमिकांसाठी अधिक ओळखला जातो.मिलिंद गुणाजी आता शतिका - द अनड्रप्ट या लघुपटात झळकणार आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन श्रीतमा दत्ताने केले असून तिची दिग्दर्शनाची ही पहिलीच वेळ आहे. या लघुपटाची निर्मिती आदित्य भारद्वाज करणार आहे. यात मिलिंदसोबत सुश्मिता मुखर्जी, हॅरी जोश आणि स्वगता नाईक यांची प्रमुख भूमिका असणार आहे. मिलिंदने त्याच्या अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. या लघुपटातदेखील तो एका नकारात्मक भूमिकेतच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शतिका या लघुपटाची दिग्दर्शिका श्रीतमा आणि मिलिंद यांची भेट कामसूत्र थ्रीडी या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. श्रीतमा या चित्रपटाची साहाय्यक दिग्दर्शिका होती. एकदा सहज गप्पा मारत असताना श्रीतमाने मिलिंदला शतिका या लघुपटाची कथा सांगितली होती आणि यात मिलिंदने काम करावे अशी तिची इच्छा असल्याचेही ती बोलली होती.  कामसूत्र थ्रीडीचे चित्रीकरण करत असताना श्रीतमा भविष्यात एक चांगली दिग्दर्शिका होऊ शकते याची जाणीव मिलिंदला झाली होती. त्यामुळे तुझ्या प्रोजक्टमध्ये मी नक्कीच काम करेन असे तेव्हाच मिलिंदने तिला सांगितले होते. वर्षभरानंतर मिलिंदला श्रीतमाने शतिका या लघुपटाबद्दल विचारले असता त्याने क्षणाचाही विचार न करता या लघुपटासाठी होकार दिला. या लघुपटाविषयी मिलिंद सांगतो, "शतिका हा लघुपट केवळ लोकांच्या मनोरंजनासाठी नसून तो स्त्री शक्तीवर भाष्य करणारा आहे. तसेच एचआयव्हीविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी या लघुपटाची मदत नक्कीच होणार आहे."