Join us  

शीतल आमटेंच्या वृत्ताने अस्वस्थ झाली मयुरी देशमुख, म्हणाली - 'मी तर रोज रडतेय पण...'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2020 12:01 PM

अभिनेत्री मयुरी देशमुख शीतल आमटेंच्या वृत्ताने अस्वस्थ झाली आणि तिने डिप्रेशनवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

शीतल आमटे यांच्या आत्महत्येमुळे सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला. त्या कौटुंबिक वादामुळे तणावात होत्या. डिप्रेशन, ताणतणाव हल्ली खूप गंभीर विषय बनत चालला आहे. बऱ्याचदा आपण डिप्रेशनकडे दुर्लक्ष करतो. असेच अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवरा आशुतोष भाकरे यांनी देखील डिप्रेशनमध्ये आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जाते. दरम्यान आता अभिनेत्री मयुरी देशमुखने याच गंभीर विषयावर एक व्हिडीओ शेअर करत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.

मयुरी देशमुखने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत म्हटले की, शीतल आमटे यांची बातमी ऐकून मी फार अस्वस्थ झाले. काही आठवड्यांपूर्वी माझी आणि शीतल ताईंची फेसबुकवरुन ओळख झाली होती. आधी कोणतीही ओळख नसताना ती माझ्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिली होती. काही महिन्यांपूर्वी मी आशुतोषला शीतल ताईचा एक व्हिडीओ दाखवला होता. आम्हाला तिचे खूप कौतुक वाटले होते. आपल्या समाजात डिप्रेशनकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. पण तुम्हाला जर तणाव किंवा नैराश्य जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा. मी तर रोज रडतेय पण मी माझ्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधते. आपण दु:खी आहोत हे आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगण्यासाठी कमीपणा वाटून घेऊ नका. या भावना व्यक्त करणाचे धाडस तुमच्यात असेल तर तुम्ही स्ट्रॉंग आहात.

पुढे मयुरी देशमुख म्हणाली की, एक समाज म्हणून आपण ताकद आणि सहनशीलता या व्याख्यांना खूप चुकीच्या पद्धतीने मांडले गेले आहे. मुलांनी रडायचे नाही, सगळी संकटे एकट्याने पेलायची, समाजातल्या मोठ्या व्यक्तींवरही हा भार आपण टाकतो. पण ते बदलणे खूप गरजेचे आहे. अशी बुरसटलेली व्याख्या आपल्यासाठीच घातक ठरते आहे.

मयुरी पुढे म्हणाली,  'आशुतोष गेल्यानंतर मला अनेक लोकांचे सोशल मीडियावरुन मेसेज आले. त्यातल्या ९९ टक्के लोकांना मी ओळखतही नाही. पण त्यांच्या मेसेजमुळे मला धीर मिळाला. त्यांच्याकडून मिळालेल्या उर्जेमळेच मला पुन्हा काम करण्याचं बळ मिळाले.

 

टॅग्स :मयुरी देशमुख