Join us
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभर चर्चेत राहिला सखी गोखले व सुव्रत जोशीचा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 19:00 IST

दुनियादारी मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सुव्रत जोशी व अभिनेत्री सखी गोखले नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाच्या चर्चेला आठवड्याभरापासून उधाण आले होते.

बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहत असताना आता मराठी चित्रपटसृष्टीतही लग्नाची धामधूम पहायला मिळत आहे. यावर्षी रॅपर किंग जेडी उर्फ श्रेयश जाधव, अभिनेत्री स्मिता तांबे, अभिनेत्री नेहा गद्रे हे कलाकार लग्नबेडीत अडकल्यानंतर आता दुनियादारी मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सुव्रत जोशी व अभिनेत्री सखी गोखले नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. या दोघांच्या लग्नाच्या चर्चेला आठवड्याभरापासून उधाण आले होते. 

२०१५ साली दुनियादारी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि या मालिकेच्या सेटवरच सुव्रत व सखीची ओळख झाली. या मालिकेत काम करत असतानाच सुव्रत व सखी यांच्यात प्रेमाचा अंकुर फुलू लागल्याचे बोलले जात होते. मात्र काही दिवसांनंतर ते दोघे सगळीकडे एकत्र दिसू लागले.

इतकेच नाही तर त्यांचे सोशल मीडियावरील फोटो पाहून ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा सगळीकडे सुरू होती. मात्र त्यांनी या वृत्ताला कधीच दुजोरा दिला नाही.

सखी गोखले शिक्षणासाठी लंडनला गेली होती. त्यादरम्यान त्या दोघांमधील प्रेम सोशल मीडियावर फोटोच्या माध्यमातून पाहायला मिळाले. इतकेच नाही तर खुद्द सुव्रतने सखीला भेटण्यासाठी लंडन गाठले होते. त्यानंतर ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा पुन्हा जोर धरू लागली होती. त्यातच सखीने सोशल मीडियावर स्पिनस्टर्स पार्टीचे फोटो शेअर केला आणि मग सुरू झाली त्या दोघांच्या लग्नाची चर्चा.

परंतु, सखीचा फोटो पाहूनही ते दोघे खरंच लग्न करणार आहेत की नाही, हे चित्र देखील स्पष्ट झाले नव्हते. मग, काही दिवसांनी सुव्रतने इंस्टाग्राम स्टोरीवर केळवणचा फोटो शेअर केला. ज्यामुळे ते दोघे विवाह बंधनात अडकणार असल्याचे निश्चित झाले. १० एप्रिलला सखीची मेहंदी सेरेमनी पार पडली. त्याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. ज्यात आरती वबडगावकर व सायली संजीव सखीला मेहंदी काढताना दिसले.

त्यानंतर रात्री जंगी सेलिब्रेशनही झाले. ज्यात सखी व सुव्रत यांच्यासोबत कलाकार मंडळी थिरकताना दिसले. 

अशाप्रकारे आठवडाभर सुव्रत व सखीचे लग्न चर्चेत राहिल्यानंतर ११ एप्रिलला त्या दोघांचा पुण्यात मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला.

सखी गोखले हिरव्या रंगाच्या साडीत वधूच्या गेटअपमध्ये खूपच सुंदर दिसत होती. त्यांच्या लग्नाचे फोटो काही कालावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झाले.

त्यांच्या लग्नाला मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. संध्याकाळी सुव्रत व सखीने सोशल मीडियावर अधिकृतरित्या लग्नाचे फोटो शेअर करून लग्नाची वार्ता आपल्या चाहत्यांना दिली. त्यांच्या या फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. 

सुव्रत जोशी व सखी गोखले यांच्या लग्नानंतर आता मराठी चित्रपटसृष्टीत आणखीन कोण लग्नबेडीत अडकणार हे जाणून घेण्यासाठी रसिक उत्सुक आहेत. 

 

टॅग्स :सुव्रत जोशीसखी गोखले