Join us  

अजिंक्य देव ते उदय टिकेकर! 22 कलाकारांची फौज असलेल्या 'झोलझाल'चा ट्रेलर प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 6:30 PM

ZolZaal : 'झोलझाल' हा चित्रपट येत्या १ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील हास्याची मेजवानी कशी रंगणार याची झलक नुकतीच चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळाली.

कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा परिणाम कमी-अधिक प्रमाणात सर्वच क्षेत्रावर झाला. यात कलाविश्वावर तर मोठं संकट कोसळलं होतं. परंतु, हळूहळू परिस्थितीत सुधारणा होत असतानाच अनेक नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. यामध्येच हसून हसून प्रेक्षकांना बेजार करणारा झोलझाल हा चित्रपटदेखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत 'युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन' अंतर्गत आणि 'रोलींगडाईस' असोसिएशन सोबत 'झोलझाल' हा चित्रपट येत्या १ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटातील हास्याची मेजवानी कशी रंगणार याची झलक नुकतीच चित्रपटाच्या ट्रेलरमधून पाहायला मिळाली. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या ट्रेलरची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात तब्बल २२ दिग्गज कलाकार झळकणार आहे.

'झोलझाल' चित्रपटात विविधांगी भूमिका साकारलेल्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळतेय. या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, ऋतुराज फडके, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, अंकुर वाढवे, विश्वजित सोनी, श्याम मसलकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे कलाकार झळकणार आहेत. मानस कुमार दास यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली असून चित्रपटाची निर्मिती गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना अग्रवाल यांनी केली आहे. 

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीउदय टिकेकर भारत गणेशपुरेअजिंक्य देव