Join us  

‘धर्मवीर’ने प्रदर्शनापूर्वीच रचला इतिहास; मुंबईत लावलं आशियातील सर्वात मोठं होर्डिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 1:48 PM

Dharmaveer: महाराष्ट्रातील विविध ठिकाणी या चित्रपटाचे ३० फुटी कट आऊट्स लावण्यात आले आहेत. इतकंच नाही तर मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे होर्डिंग लावण्यात आलं आहे.

एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सफल झालं याचं परिमाण सांगताना आपण नेहमी 'मरावे परंतु कीर्ती रुपी उरावे' या उक्तीचा वापर करतो. आपण हयात नसतानाही किर्तीरूपांत लोकांच्या स्मरणात राहणे, त्यांच्या आठवणीत जिवंत राहणे यापेक्षा सुंदर गोष्ट काय असू शकते. असं जगणं फार कमी लोकांच्या वाट्याला येतं.अशा जगण्याचं नितांत सुंदर उदाहरण म्हणजे धर्मवीर आनंद दिघे (anand dighe). समाजकार्यासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या आनंद दिघे यांच्या जीवनावर लवकरच एक चित्रपट येत आहे. त्यामुळेच या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो सातत्याने प्रेक्षकांमध्ये चर्चेत येत आहे. विशेष म्हणजे आता हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्याने एक विक्रम रचला आहे.

‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' (dharmaveer)या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून तो सातत्याने चर्चेत येत आहे. यात चित्रपटातील अभिनेता प्रसाद ओकच्या (prasad oak) लूकपासून ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होत आहे. त्यामुळे या चित्रपटाला मिळत असलेलं प्रेम पाहून प्रत्येक जण भारावून गेला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वी एक मोठा विक्रम केला आहे. पहिल्यांदाच एका चित्रपटाचं सर्वात मोठं होर्डिंग उभारण्यात आलं असून हे होर्डिंग आशियातील सर्वात मोठं होर्डिंग असल्याचं म्हटलं जात आहे. 

कुठे उभारलंय 'धर्मवीर'चं सर्वात मोठं होर्डिंग

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी या चित्रपटाचे ३० फुटी कट आऊट्स लावण्यात आले आहेत. इतकंच नाही तर मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे १६,८०० स्क्वेअर फुटाचे भव्य असे होर्डिंग लावण्यात आलं आहे. या होर्डिंगवर आजवर एकाही मराठी चित्रपटाचे पोस्टर झळकले नव्हते. परंतु, आता धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाचं भव्य दिव्य पोस्टर झळकले आहे. 

दरम्यान, धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक यांचा हा तेजस्वी आणि करारी बाण्याचा लूक मोठ्या दिमाखात या होर्डिंगवर पाहायला मिळत आहे. सध्या सर्वत्र याच होर्डिंगची चर्चा बघायला मिळत आहे. आभाळाएवढं व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या लोककारणी आनंद दिघे यांचा चरित्रपट असलेल्या या चित्रपटाचे हे होर्डिंग बघताना आभाळासम भासे धर्मवीर हा असाच भाव सर्वांच्या मनात उमटत आहे. झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला, आणि प्रविण तरडे यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मु.पो. ठाणे हा चित्रपट येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :सिनेमाप्रसाद ओक प्रवीण तरडे