Join us  

धर्मवीर: 'गुरुपौर्णिमा'ला मिळतोय उदंड प्रतिसाद; अवघ्या २० तासांमध्ये मिळाले २० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2022 7:08 PM

Dharamveer: अलिकडे आनंद दिघे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे  या गुरुशिष्यामधील नातं दर्शविणारं गुरुपौर्णिमा हे गाणं प्रदर्शित झालं.

एखाद्या व्यक्तीचं आयुष्य सफल झालं याचं परिमाण सांगताना आपण नेहमी 'मरावे परंतु कीर्ती रुपी उरावे' या उक्तीचा वापर करतो. आपण हयात नसतानाही किर्तीरूपांत लोकांच्या स्मरणात राहणे, त्यांच्या आठवणीत जिवंत राहणे यापेक्षा सुंदर गोष्ट काय असू शकते. असं जगणं फार कमी लोकांच्या वाट्याला येतं.अशा जगण्याचं नितांत सुंदर उदाहरण म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे ही गुरू शिष्याची जोडी. आपल्या हयातीत या दोघांना लोकांचं जेवढं प्रेम मिळालं तेवढंच प्रेम त्यांच्या इहलोकी गेल्यानंतरही कायम आहे. या प्रेमाची प्रचिती आपल्याला वारंवार येतच असते. याहीवेळी ती आली आहे आणि त्यासाठी निमित्त ठरलं आहे 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट. 

ठाण्याचा ढाण्या वाघ असलेले जननायक धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून आनंद दिघे यांचा राजकीय प्रवास उलगडला जाणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता बघायला मिळत आहे. सुरुवातीला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि त्याच्याच पाठोपाठ या चित्रपटातील 'गुरुपौर्णिमा' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. विशेष म्हणजे या गाण्याला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला.

अलिकडे आनंद दिघे आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे  या गुरुशिष्यामधील नातं दर्शविणारं गुरुपौर्णिमा हे गाणं प्रदर्शित झालं. विशेष म्हणजे अवघ्या २० व्ह्यूज मिळाले. त्यामुळे हे गाणं युट्यूबवर सुद्धा नंबर १ ला ट्रेडिंग झालं.

दरम्यान, धर्मवीर आनंद दिघे यांच्यासाठी गुरू, मार्गदर्शक, तत्त्वेता एवढंच नाही तर त्यांच्या गाभाऱ्यातील देवाच्या स्थानी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेबांचा आदेश म्हणजे दिघे यांच्यासाठी अखेरचा शब्द. अशा या गुरुची पाद्यपूजा करत या नात्याला सन्मान देणारा प्रसंग गुरुपौर्णिमा या गाण्यातून रेखाटण्यात आलाय. या गाण्यामुळे आता चित्रपटाबद्दलची कमालीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. येत्या १३ मेला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

टॅग्स :सिनेमाबाळासाहेब ठाकरेसेलिब्रिटीप्रसाद ओक