मराठी प्रेक्षक अधिक प्रगल्भ
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 14:09 IST
अत्यंत वेगळ्या विषयावरचे मराठी चित्रपट चालत आहेत. कसदार अभिनय आणि चांगल्या विषयांना मराठी ...
मराठी प्रेक्षक अधिक प्रगल्भ
अत्यंत वेगळ्या विषयावरचे मराठी चित्रपट चालत आहेत. कसदार अभिनय आणि चांगल्या विषयांना मराठी चित्रपटांचा पाठिंबा मिळत असून त्याबाबत प्रेक्षकांचे कौतुक करायला हवे. सैराट, नटसम्राट, कट्यार काळाजत घुसली या चित्रपटांना यश मिळाले आहे. कट्यारसारखा चित्रपट तर अत्यंत रिस्की होता. या धाडसाला प्रेक्षकांनी उचलून धरले. आम्हाला चांगले द्या, त्याचा स्वीकार करतो हे मराठी प्रेक्षकांनी सिध्द केले आहे. कलाकारांच्या नावांपेक्षा त्यांचा कसदार अभिनय प्रेक्षकांना भावत आहे. कोर्टसारखा सिनेमा तर मराठीचे मोठे यश आहे. काळाच्या खूप पुढचा विचार त्यामध्ये केला आहे. सैराटसारखा वास्तववादी सिनेमा करणे हे तर एक धाडस आहे. अनेक हिंदी चित्रपटांना बाजुला सारून सैराटने यश मिळविले आहे. नाव असलेले कलाकार नाहीत. चित्रपटाची कथाही प्रमोचा अंत कारुण्यात होतो, अशी आहे. कयामत से कयामत तक, एक दुजे के लिए सारख्या चित्रपटांत हे होते. परंतु, त्यामध्ये तद्दन फिल्मीपणाही होता. सैराटमध्ये मात्र गावपातळीवरील समाज, जात व्यवस्था, समाजव्यवस्था यांच्यावर धाडसाने भाष्य केले आहे. चित्रपटाचा शेवट तर सुन्न करणारा आहे. लहान मुलाचे रक्तबंबाळ पाय सुडाचा हा प्रवास चालूच राहणार आहे, हा संदेश देतो. मुलगा खालच्या जातीतील, मुलगी उच्च वर्गीय अशी तळागाळातल्या लोकांना सुखावणारी कहानीही आहे. परंतु, इतका रिअ?ॅलिस्टिक सिनेमा हिंदीमध्येही बनू शकत नाही. मराठी प्रेक्षकांनी त्याला स्वीकारले याबाबत कौतक आहे. सध्या मराठीमध्ये अनेक बाहेरचे निमार्ते आले आहेत. त्यांनाही आता समजेल की चांगला विचार मांडणारा चित्रपट नसेल तर प्रेक्षक स्वीकारणार नाहीत. साऊथचे अनेक रिमेक सध्या बनत आहेत. पण त्यांना फारसे यश मिळत नाही. मराठी मनाचा, मराठी स्पंदनाचा त्यांना अंदाज येत नाही. आमच्या मातीतील गोष्ट दाखवा, आमचे प्रश्न मांडा ही त्यांची मागणी आहे. - ऋषीकेश जोशी