Join us

"वचन देतो, विश्वासघात करणार नाही" केदार शिंदे यांची खास पोस्ट, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 12:01 IST

केदार शिंदे यांनी एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे.

Kedar Shinde on Zhapuk Zhupuk Movie: 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) याचा बहुचर्चित 'झापुक झुपूक' हा चित्रपट आज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बिग बॉस' शोच्या महाअंतिम सोहळ्यात दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्याच्याबरोबर 'झापुक झुपूक' (Zhapuk Zhupuk) चित्रपट करणार असल्याची घोषणा केली होती. सुरजला दिलेला शब्द अखेर केदार शिंदे यांनी पुर्ण केलाय. आज गुलिगत किंगचा 'झापुक झुपूक' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. केदार शिंदेसाठी हा चित्रपट खास आहे आणि याबद्दल त्यांनी एक खास पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. 

केदार शिंदे यांनी पोस्ट शेअर करत 'झापुक झुपूक' चित्रपट तयार करताना मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानलेत. त्यांनी लिहलं, "आज 'झापुक झुपूक' प्रदर्शित होतोय. प्रयत्न केलाय नेहमीप्रमाणेच. निखिल साने यांना #biggbossmarathi सुरू असतानाच फोन केला. सुरजसोबत फिल्म करायची आहे. २५ वर्षांची आमची मैत्री. त्यामुळे माझ्या विश्वासावर त्यांनी ज्योती देशपांडे यांच्याशी बोलून @jiostudiosmarathi ची दारं खुली केली. आणि एक प्रवास सुरू झाला. आज तो तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतोय. यावेळीही बेला शिंदे माझ्यासारख्या वेड्या कल्पक माणसासोबत उभी राहीली. तीला बहूधा आता माझ्या YZ कल्पनांची सवय झालीय. सना शिंदे वेळोवेळी माझी मुलगी असूनही आईच्या भूमिकेत मला सल्ला देते", असं त्यांनी म्हटलं.

यासोबतच केदार शिंदे यांनी प्रेक्षकांना संबोधित करत लिहलं, "आता सगळं तुमच्या हवाली. एकच वचन देतो. आधीच्या सगळ्या कलाकृतींवर विश्वास ठेवलात. तुमचा विश्वासघात करणार नाही. तुम्हाला नाराज नाही करणार. मी हे सगळं करू शकलो ते माझ्या mind-blowing team मुळे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद", या शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. या पोस्टवर अनेकांनी 'झापुक झुपूक' चित्रपटासाठी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, झापुक झुपूक या चित्रपटात सूरज चव्हाण, जुई भागवत यांच्याबरोबरच इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी असे अनेक लोकप्रिय कलाकार प्रमुख भूमिकांत आहेत. चित्रपटामधील गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.  

टॅग्स :केदार शिंदेसेलिब्रिटीमराठी अभिनेतामराठी चित्रपट