Hruta Durgule: 'महाराष्ट्राची क्रश' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. मराठी मालिका, चित्रपटांच्या माध्यमातून हृता घराघरात पोहोचली. हृताने ‘फुलपाखरू’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. .तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांना वेड लावलं. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. सध्या ही अभिनेत्री आरपार या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेच. या चित्रपटात तिची ललित प्रभाकरसोबत जोडी जमली आहे. याचनिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या आणि प्रतीक शाहच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.
दरम्यान, डिसेंबर २०२१ मध्ये हृताने प्रतीक शाहसोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या सुखी संसाराला ४ वर्ष पूर्ण झाली आहेत. नुकतीच हृताने सुमन म्युझिक मराठी ला मुलाखत दिली. या मुलाखतीत हृताला तिच्या आणि प्रतिकच्या पहिल्या भेटीबद्दल विचारण्यात आलं. हृता-प्रतिकची पहिली भेट ही सात-आठ तासांची होती, असंही अभिनेत्रीने सांगितलं. त्याविषयी बोलताना हृता म्हणाली, "एकदा मी प्रतिकला पहिल्यांदा भेटण्यासाठी नकार दिला होता. तर तो मला म्हणालेला ठीक आहे, काहीच अडचण नाही. त्यानंतर मग तो म्हणाला आता मी काही दिवसांसाठी शूटसाठी जातो तर मग मला परत महिना दीड महिना भेटता येणार नाही. त्यामुळे मी त्याला भेटायचं ठरवलं. तेव्हा आमच्यामध्ये मैत्रीचं नातं होतं. शिवाय मी त्याच्या आईला देखील ओळखत होते. त्यामुळे काहीच झालं तर त्यांना कॉल करेन असाच माझा विचार होता. मग म्हटलं एकदा तर याला नाही म्हटलंय, तर आता हे बरोबर वाटत नाही. मुळात माझा स्वभाव तसा नाही."
पुढे हृता त्या भेटीबद्दल सांगताना म्हणाली, "एक असतं की आपल्याला सगळ्या गोष्टी स्वत:ला करायच्या असतात. स्वत:ला सिद्ध करायचं असतं. त्यावेळी आमची पहिली भेट अशीच होती. मला वेळेत जाणं कायम आवडतं. तेव्हा त्याला भेटायला जाताना माझी गाडी पंक्चर झाली. हे सगळं मी प्रतिकला फोनद्वारे कळवलं. विशेष म्हणजे तो माझ्याआधी तिथे पोहोचला होता. मग तो म्हणाला की मी तिथे येतो आणि तो त्या ठिकाणी आला. ते सगळं झाल्यानंतर आम्ही आपआपल्या गाड्यांमध्ये होतो. तेव्हा नुकताच कोविड संपला होता आणि रेस्टॉरंट वगैरे सुरु झाले होते. दोन-तीन ठिकाणी फिरल्यानंतर कुठेही आम्हाला जागा मिळाली नाही. शेवटी मग आम्ही ओशिवरामध्ये एका ठिकाणी भेटलो. त्यावेळी मग तिथे आम्ही पहिल्याच भेटीत जवळपास आठ तास गप्पा मारल्या. "
लग्नाबद्दल हृता काय म्हणाली...
"लग्न ही खूप मोठी जबाबदारी आहे. माझ्या फक्त बेसिक अपेक्षा होत्या. खूप काळाने मी असा मुलगा बघितला की जो त्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी तो त्याच्या हक्कासाठी उभा राहणारा आहे. आमच्या लग्नाला आता चार वर्ष होतील आणि आम्ही एकमेकांना डेट वगैरे केलं नाही. आम्ही भेटल्यानंतर ६ महिन्यांच्या आत आमचा साखरपुडा ठरला. आणि त्यानंतर ६ महिन्यांतच आमचं लग्न झालं." असा खुलासा अभिनेत्रीने केला.