Santosh Juvekar: मराठमोळा अभिनेता संतोष जुवेकर हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. आजवर त्याने अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने साकारलेल्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. अलिकडेच हा अभिनेता लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित छावा चित्रपटात पाहायला मिळाला.याच चित्रपटाच्या दरम्यान, विविध मुलाखतींमध्ये अभिनेत्याने छावाच्या सेटवर सांगितलेले किस्से देखील चर्चेत आले होते. त्यामुळे त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. अशातच आता विजय तेंडुलकर लिखित 'घाशीराम कोतवाल' हे कालातीत नाटक आता हिंदी रंगभूमीवर येत आहे. या नाटकातून तो रंगभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचनिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने कलाकारांच्या ट्रोलिंगवर भाष्य केलं आहे.
नुकतीच संतोष जुवेकरने 'सकाळ प्रिमिअर'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान त्याला हल्ली मराठी कलाकारांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं, याबद्दल तुला काय वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. त्याविषयी बोलताना संतोष जुवेकर म्हणाला, "ट्रोलिंगमुळे आपल्याला त्रास होत नाही किंवा मला काही वाटत नाही असं कितीही म्हटलं तर थोडसं वाईट वाटतंच. कितीही मोठा माणूस असला किंवा तो किती खंबीर मनाचा असला तरी त्याला वाईट वाटतंच. जर एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहीत असतं की ती व्यक्ती आपल्यावर का रागावली आहे? मला त्यामागचं कारण माहीत असतं. पण, जेव्हा कारण माहीत नसतं आणि उगाच लोक आपल्याबद्दल बोलतात, ट्रोल करतात किंवा आपली निंदा करतात. शिवाय ते अशा गोष्टी का करत आहेत यामागचं कारणच जर माहीत नसेल तर, त्यात का मी अडकू."
यापुढे संतोष जुवेकरने म्हटलं, "त्यांना जर ट्रोल करायचं आहे तर करु देत. ते त्यांच काम आहे. मी माझं काम करतोय. मला असं वाटतं कधी-कधी गालगुच्चा घेताना चिमटा लागतोच. शाबसकीची थाप देताना रट्टा लागतोच. त्यामुळे ठिक आहे काही हरकत नाही. मला वाटतंय आपण आपल्यावर लक्ष केंद्रित करायला हवं." असं मत अभिनेत्याने मांडलं आहे.