Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. देशवासीयांना दहशतवाद्यांचा समूळ विनाश हवा आहे. या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. महत्वाचे म्हणजे, त्या कट्टरपंथी दहशतवाद्यांनी धर्म विचारून, कलमा पढायला सांगून, या निष्पाप पर्यटकांवर गोळ्या झाडल्या.या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तावर विविध प्रकारचे निर्बंध लादले आहेत. या पार्शभूमीवर अनेक राजकीय मंडळी तसेच मनोरंजनविश्वातील कलाकारांनी प्रतिक्रिया मांडल्या. त्यात आता एका मराठी अभिनेत्याने आयसीसी आणि बीसीसीआयला खास विनंती करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. हा अभिनेता म्हणजे पुष्कर जोग (Pushkar Jog) आहे.
पुष्कर जोगने पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत आपल्या मनातील तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने आयसीसी आणि बीसीसीआयला विनंती करत म्हटलंय, " मी आयसीसी आणि बीसीसीआयला विनंती करतो की त्यांनी पाकिस्तानसोबत कोणतेही द्विपक्षीय मालिका किंवा आयसीसी टूर्नामेंट सामने खेळू नयेत, जरी यातून आर्थिक फायदा असले तरीही. आता पुरे झालं.., आपल्या सैनिकांच्या आणि सामान्य लोकांची सूरक्षा करणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. जय हिंद जय भारत. आम्ही हिंदू आणि मुस्लिम सर्व एक आहोत आणि आम्ही दहशतवादाविरुद्ध लढू आणि मजबूतपणे उभे राहू." दरम्यान, पुष्कर जोगसह मराठी इंडस्ट्रीतील बऱ्याच कलाकारांनी पहलगाम येथील हल्ल्याचा निषेध करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, काश्मीरमधील या हल्ल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. देशाच्या सुरक्षा यंत्रणा देखील सतर्क झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत यामध्ये सहभागी असलेल्या कोणालाही सोडलं जाणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे.