Jaywant Wadkar: अभिनेते जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी आजवर मराठीमधील अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. रुपेरी पडद्यावर त्यांनी विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अशातच सध्या जयवंत वाडकर हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आले आहेत. या मुलाखतीमध्ये त्यांनी पत्नी गरोदर असताना अक्कलकोटला जाताना घडलेला एक प्रसंग सांगितला आहे.
नुकतीच जयवंत वाडकर यांनी 'लोकशाही फ्रेंडली'ला मुलाखत दिली. त्यादरम्यान, त्यांनी मुलीच्या नावाचा किस्सा सांगत म्हणाले, "ज्यावेळी माझी पत्नी दुसऱ्यांदा गरोदर होती, तेव्हा डॉक्टरांना प्रेग्नसींमध्ये खूप प्रॉब्लेम आहेत असं सांगितलं होचं. त्यावेळी ती दर महिन्याला अक्कलकोटला दर्शनाला जायची. तेव्हा नववा महिना असताना तिने तिकडे जायची इच्छा व्यक्त केली. त्यादरम्यान, सोलापूर आल्यानंतर गाडीचा ब्रेक लागतच नव्हता. पण, कोणत्याही परिस्थितीत तिला अक्कलकोटला जाऊन आरतीला पोहाचायं होतं."
त्यानंतर जयवंत वाडकर म्हणाले, "मग कसेतरी आम्ही तिकडे पोहोचलो.अक्कलकोटला गेल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघालो. त्यावेळी गाडीचा मॅकनिक आम्हाला म्हणाला, तुम्ही जवळपास ४२ किलोमीटर लांबून इथे आलातच कसे? ही स्वामींची कृपा...! मला ती प्रचीती घडली. मग मी परत स्वामींकडे गेलो ढसाढसा रडलो. म्हणजे गाडीचा ब्रेक खराब झाला होता. त्यावरुन मी माझ्या मुलीचं नाव स्वामिनी ठेवलं." असा किस्सा त्यांनी शेअर केला.