Join us  

'काय गं गोव्याची मुलगी...' बाळासाहेब ठाकरेंच्या शेजारी राहायच्या वर्षा उसगांवकर; सांगितल्या आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 5:24 PM

कधीही रात्री अपरात्री मला कलानगरमध्ये जाताना भीती वाटली नाही...वर्षा उसगांवकर यांनी बाळासाहेबांच्या आठवणी केल्या ताज्या

मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गज अभिनेत्रींपैकी एक म्हणजे वर्षा उसगांवकर. सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे विचार तर खूपच पुढारलेले होते. मराठी सिनेसृष्टीतील एक काळ त्यांनी गाजवला. वर्षा उसगांवकरमुंबईत कलानगर येथे राहायच्या. कलानगर म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासांहेब ठाकरे यांचा परिसर. बाळासाहेबांच्याच शेजारी वर्षा उसगांवकर राहत होत्या. त्यांच्या मजेशीर आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे. 

'लोकमत फिल्मी'शी बोलताना वर्षा उसगांवकर म्हणाल्या, "बाळासाहेब ठाकरेंचं घर माझ्या शेजारी होतं. त्यामुळे मला छान २४ तास पोलिस सुरक्षा असायची. कधीही रात्री अपरात्री मला कलानगरमध्ये जाताना भीती वाटली नाही. बऱ्याच वेळेला ते मला घरी बोलवायचे, गप्पा मारायचे, छान गोष्टी सांगायचे, जोक्स सांगायचे. त्यांचा स्वभाव खूप खेळकर होता. ते खूपच मार्मिक बोलायचे. मला म्हणायचे काय गं..गोव्याची मुलगी. कशी काय गोव्यावरुन इथे आलीस? दामूकडे राहतेस तू..?"

त्या पुढे म्हणाल्या, "एकदा मी आणि आई त्यांना भेटायला गेलो होतो. तेव्हाही त्यांनी आम्हाला खूप हसवलं असाच त्यांचा स्वभाव होतो. मला आठवतंय ते म्हणालेले की, मी बिअर पितो, पण ही कॅलरीशिवाय असलेली बिअर आहे. तेव्हा मी मनात म्हणलेलं बापरे हे सगळ्यांना सांगून बिअर पितात. असा त्यांचा गंमतीशीर स्वभाव होता. मग आमच्यासमोर कलाकारांना फोन लावायचे. आमचंही बोलणं करुन द्यायचे. मला त्यांचा स्वभाव खूप आवडायचा. मला असं वाटायचं की बापरे ज्यांच्याबद्दल एवढं लिहून येतं ते बाळासाहेब ठाकरे माझ्या शेजारी राहतात. त्यांचं मला रोज दर्शन होतं म्हणजे मी किती भाग्यवान आहे. महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब ठाकरे असंच ते समीकरण होतं."

वर्षा उसगांवकर अजूनही मनोरंजनविश्वात काम करत आहेत. स्टार प्रवाहवरील लोकप्रिय 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत त्यांनी भूमिका साकारली. याही वयात त्यांच्या फिटनेसचं आणि सौंदर्याचं कौतुक करावं तितकं कमीच आहे.

टॅग्स :वर्षा उसगांवकरमराठी अभिनेताबाळासाहेब ठाकरेमुंबई