Join us  

मृत्युच्या दारातून थोडक्यात बचावली मानसी नाईक; 2 वेळा झाला होता गंभीर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2024 10:00 AM

Manasi naik: त्या अपघातानंतर मानसीने रात्री प्रवास करणं कायमचं बंद केलं.

अभिनयासह नृत्यकौशल्यामुळे चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक. गेल्या कित्येक वर्षांपासून कलाविश्वात सक्रीय असलेली मानसी मध्यंतरी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली होती. मानसीने तिच्या वैवाहिक जीवनाविषयी अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला. अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने हे खुलासे केले होते. याच मुलाखतीमध्ये तिने अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला आहे. तब्बल २ वेळा मानसी मृत्युच्या दारातून परत आली आहे.रात्रीचा प्रवास करत असताना तब्बल २ वेळा मानसीचा गंभीर अपघात झाला. या अपघातातून ती थोडक्यात बचावली. मात्र, मनात कायम भीतीने घर केलं आहे.कसा झाला मानसीचा अपघात?"एक्स्प्रेस हायवेवरुन जात असताना दोन वेळा माझा गंभीर अपघात झाला. एका अपघातात माझी संपूर्ण टीम माझ्यासोबत होती. त्या अपघातामध्ये माझ्या डोळ्याला लागलं होतं. सुदैवाने मी डोळे बंद करुन गाडीत बसले होते त्यामुळे मी थोडक्यात बचावले. पण, माझे बॉडीगार्ड पुढे बसले होते. त्यांच्या डोक्याला मात्र प्रचंड मार लागला होता. माझ्यासोबत असलेल्या मुलीला सुद्धा मार लागला होता", असं मानसीने सांगितलं.

पुढे ती म्हणते, "आम्ही रात्रीचा प्रवास करत होतो. मी सर्वांना सांगेन की, रात्रीचा प्रवास करु नये कारण ड्रायव्हरला झोप लागू शकते. आमची गाडी ट्रॅकमध्ये घुसली होती. इन्होवा कारची नॅनो कार झाली. अपघात झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ मदक केली. सगळं इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांनी हाताळलं की कुठेही मीडियाला कळू दिलं नाही. पण, त्यानंतर मी रात्रीचा प्रवास करणं थांबवलं. गाडीची अवस्था पाहून देव आपल्याला खूप चान्सेस देतो असं मला वाटलं. या अपघातानंतर माझा देवावरचा विश्वास अजून वाढला. "

टॅग्स :मानसी नाईकसेलिब्रिटीसिनेमाअपघात