Waves Summit 2025: भारताच्या पहिल्या ‘जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन’ (वेव्हज) शिखर परिषदेचं आयोजन आज मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये करण्यात आलं. मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी या परिषदेसाठी आज हजर झाले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना संबोधितही केलं. मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरही या परिषदेसाठी उपस्थित होती. तिथे तिने 'थलायवा' रजनीकांत यांच्यासोबत फोटो काढला. रजनीकांत यांना भेटल्याचा आनंद तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
'वेव्हज' परिषद १ ते ४ मे पर्यंत आयोजित करण्यात आली आहे. आज पहिल्या दिवशी मनोरंजनविश्वातील रजनीकांत, रणबीर कपूर, आलिया भट, करण जोहर, शाहरुख खान, दीपिका पदुकोणसह अनेक तारे तारकांनी हजेरी लावली. अभिनेत्री अमृता खानविलकरनेही इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत ती या परिषदेसाठी जात असल्याचं शेअर केलं. तर आता तिने 'थलायवा'रजनीकांत यांच्यासोबत फोटोही शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शन देत लिहिले, "आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र दिवस साजरा झाला. 'थलायवा'चे दर्शन."
यासोबत अमृताने नरेंद्र मोदी यांचाही व्हिडिओ शेअर करत लिहिले, "महाराष्ट्राच्या स्थापनादिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! १ मे – हा केवळ एका राज्याच्या निर्मितीचा दिवस नाही, तर तो आपल्या एकतेचा, संघर्षाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. हा दिवस आपल्या मातीतल्या संस्कृतीचा, परंपरेचा, आणि शौर्याचा गौरव करण्याचा दिवस आहे. आज वेव्ह समीट या कार्यक्रमात आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांनी देशाच्या भविष्यासंदर्भातील आपले विचार आणि दृष्टीकोन व्यक्त केला. ही केवळ एक सभा नव्हती, तर एक ऊर्जेने भरलेला अनुभव होता – जिथे नव्या भारताचे स्वप्न, तरुणाईचा उत्साह, आणि तंत्रज्ञानाची दिशा एकत्र आली होती.
Waves सारख्या कार्यक्रमातून देशातील तरुण पिढीला प्रेरणा देणं, त्यांचं मनोबल वाढवणं आणि त्यांना देशाच्या प्रगतीमध्ये सहभागी करून घेणं हेच या भेटीमागचं प्रमुख उद्दिष्ट होतं. उपस्थितांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, आणि ही संधी नव्या कल्पनांना, नव्या ऊर्जा निर्माण करणारं एक व्यासपीठ ठरली. हे खरंच ‘नवा भारत’ घडवण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल होतं.Ps - त्याच बरोबर थलैवा रजनीकांत यांच्या दर्शनाचाही योग आला! जय महाराष्ट्र!"