Join us  

राज ठाकरेंनी मराठी कलाकारांना सुनावल्यानंतर आनंद इंगळेंची प्रतिक्रिया, म्हणाले, 'सुखद धक्का...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 1:47 PM

अंड्या, पाद्या...मराठी कलाकारांच्या टोपणनावावरुन राज ठाकरेंनी खडसावल्यानंतर आनंद इंगळे पहिल्यांदाच बोलले

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) काही दिवसांपूर्वी १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला हजेरी लावली. यावेळी राज ठाकरेंनी व्यासपीठावरच आपल्या भाषणातून मराठी कलाकारांची कानउघाडणी केली. मराठी कलाकार एकमेकांना जाहीररित्या अंड्या, पाद्या अशी हाक मारतात. जर तुम्ही सहकलाकाराचा आदर ठेवत नाही तर लोक तुमचा आदर कसे करणार असं म्हणत त्यांनी कलाकारांना खडसावलं. यावर मराठी अभिनेते आनंद इंगळे (Anand Ingle) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आनंद इंगळे हे मराठीतील विनोदी अभिनेते आहेत. त्यांना जवळपास सर्वच मराठी कलाकार 'अंड्या' अशीच हाक मारतात. हे प्रेक्षकांनाही माहित आहे. राज ठाकरेंना हीच गोष्ट पटत नाही. 'रेडिओ सिटी मराठी'ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आनंद इंगळे म्हणाले, "याआधीही अनेकवेळेला राज ठाकरेंशी बोलताना हा विषय निघाला होता. ते असं जाहीरपणे म्हणतील हा माझ्यासाठी खूपच सुखद धक्का होता. ते म्हणतात तो मुद्दा मला १०० टक्के पटतो. कोणीतरी मला माझ्या टोपणनावाने हाक मारुन माझी किंमत कमी होते असं माझं म्हणणं नाहीए. पण सगळ्याच जणांसाठी सगळ्या गोष्टी नसतात हे अधोरेखित करण्याची गरज आहे."

ते पुढे म्हणाले,"आणखी एक मुद्दा म्हणजे हे जसं आपण कलाकारांनी पाळलं पाहिजे तसंच वेगवेगळ्या चॅनलवर, अवॉर्ड कार्यक्रमांमध्ये कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर विनोद करणंही थांबवलं पाहिजे. काही कार्यक्रमांमध्ये मी अत्यंत कुचका किंवा सतत किचकिच करणारा माणूस आहे असं जेव्हा विनोद म्हणून दाखवलं जातं तेव्हा मला असं वाटतं अरे नंतर याचा परिणाम वेगळा होतो. आपणच ही गोष्ट जपायला हवी, नॅशनल टेलिव्हिजनवर तर जपायलाच हवी. वैयक्तिक आयुष्यातही जपायला हवी ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. राज ठाकरेंचं म्हणणं मला १०० टक्के पटतं."

नाट्यसंमेलनात राज ठाकरेंनी कलाकारांना खडसावताना एक उदाहरणही दिलं होतं. ते म्हणाले होते की,"रजनीकांत आणि इलायराजा रात्री एकत्र बसून दारू पित असतील. पण, ऑन स्टेज आल्यावर ते सर म्हणून आदराने एकमेकांना हाक मारतात. त्यांचे कितीही घनिष्ठ संबंध असले तरी ते कार्यक्रमात एकमेकांना सन्मानपूर्वक वागवतात. मराठी कलाकारांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही जर एकमेकांना मान दिला तर लोक तुम्हाला मान देतील, अन्यथा तो मिळणार नाही."

टॅग्स :मराठी अभिनेताराज ठाकरेमराठी चित्रपटनाटकमराठी नाट्य संमेलन