Join us  

प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित खेडेकरला मातृशोक; वयाच्या 60 व्या वर्षी मालवली आईची प्राणज्योत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 11:21 AM

Ameet khedekar: आईच्या निधनामुळे अमित पूर्णपणे कोसळून गेला आहे. त्यामुळे त्याने या पोस्टच्या माध्यमातून त्याच्या भावनांना वाट मोकळी केली.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अमित खेडेकर ( Ameet khedekar) याला मातृशोक झाला आहे. बुधवारी (१५ मे) अमितच्या आईने अखेरच्या श्वास घेतला. गेल्या कित्येक काळापासून त्या कर्करोगाशी लढा देत होत्या. अखेर वयाच्या ६० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. अमितने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दु:खद बातमी चाहत्यांना दिली आहे.

आईच्या निधनामुळे अमित पूर्णपणे कोसळून गेला आहे. त्यामुळे त्याने या पोस्टच्या माध्यमातून त्याच्या भावनांना वाट मोकळी केली. अमितची ही पोस्ट पाहिल्यावर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

काय आहे अमितची पोस्ट?

हे सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की माझी आई, सौ. सुनिता खेडेकर, 15 मे रोजी रात्री 12.50 च्या सुमारास वयाच्या 60 व्या वर्षी या जगातून कायमची निघून गेली आहे. ती गेल्या काही काळापासून कर्करोगाशी झुंज देत होती. ती माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी सर्वस्व होती. तिच्या निधनाने माझे पूर्ण कुटुंबीय दुःखाच्या छायेत आहेत. तिच्या जवळच्या लोकांपलीकडे ही, माझ्या आईचा प्रेमळ प्रभाव आमच्या व्यापक समुदायावर पसरला आहे. ती नेहमी गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी, अडचणी ऐकून घेण्यासाठी, दुःखात गरजूंना खांदा देण्यासाठी तयार असायची. तिच्या दयाळूपणाच्या आणि उदारतेच्या निःस्वार्थ कृत्यांनी अनेकांच्या जीवनाला स्पर्श केला आणि तिच्याबरोबर संपर्कात आलेल्या सर्वांवर एक अमिट छाप सोडली. खरंतर तिच्या नसण्याने आमच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण झाली आहे त्याचं वर्णन शब्दात करू शकत नाही. या कठीण काळात आमच्या सोबत असलेल्या तुम्हा सर्वांचे आम्ही ऋणी आहोत. तिच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना..खेडेकर कुटुंबीय.

दरम्यान, अमित मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक गाजलेल्या मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. अमितने अभिनेत्री रश्मी अनपटसोबत लग्न केलं असून त्यांना एक मुलगादेखील आहे.

टॅग्स :सिनेमासेलिब्रिटीरश्मी अनपटमराठी अभिनेता