Join us
Daily Top 2Weekly Top 5

एक मराठा लाख मराठा चित्रपटाचे पोस्टरचे अनावरण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 15:15 IST

एक व्यक्ती समाज बदलू शकतो का? कदाचित याचं उत्तर देणे कठीण होईल. परंतु एका व्यक्तीसाठी लाखोंचा जनसमुदाय एकटवला तर ...

एक व्यक्ती समाज बदलू शकतो का? कदाचित याचं उत्तर देणे कठीण होईल. परंतु एका व्यक्तीसाठी लाखोंचा जनसमुदाय एकटवला तर मात्र चित्र बदलू शकते. अशाच प्रकारचा विषय सातारा जिल्ह्यातील एका छोट्या गावातील गणेश शिंदे या उमद्या तरुणाने एक मराठा लाख मराठा या मराठी चित्रपटातून मांडला आहे. अलीकडेच छत्रपती उदयराजे भोसले यांच्या हस्ते या चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले. ओम साई सिने फिल्म्स या निर्मिती संस्थेअंतर्गत गणेश शिंदे यांनी या सिनेमाची  निर्मिती केली आहे. सेन्सॉरच्या अनेक गुंतागुंतीत अखेर या सिनेमाला हिरवा कंदील मिळाला आहे. आता २४ नोव्हेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. याप्रसंगी राजे म्हणाले की, गणेशच्या लहान वयातील हे मोठे धाडस कौतुकास्पद आहे. आपण ज्या समाजात राहतो तिथल्या घटना सिनेमातुन मांडण्याचे धाडस त्याने केले आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसाने हा सिनेमा नक्की बघावा. गणेशला शुभेच्छा देत हा सिनेमा बघण्याची इच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. ग्रामीण भागात राहणाऱ्या गणेशची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती, परंतु सिनेमा क्षेत्रात काहीतरी करण्याचे स्वप्न उराही बाळगून असल्याने, प्रसंगी हॉटेल आणि मंडप डेकोरेटर्सकडे काम करून दिवस काढत, अनेक दिग्गजांना वेळवेळी भेटून त्यांच्याकडून सिनेमाचे तंत्र अवगत केले. चित्रपट निर्मिती, वितरण या सर्व बाबींचा अनेक वर्ष सखोल अभ्यास केल्यानंतर एक मराठा लाख मराठा या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका साकारण्याचे शिवधनुष्य गणेश शिंदेने पेलले आहे.  गणेश सिनेमाबद्दल सांगतात की, एक मराठा लाख मराठा हा सिनेमा म्हणजे मराठी माणसाची व्यथा आहे. शेतकरी कुटुंबात राहणाऱ्या एका तरुणाची ही कथा आहे. आपल्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी व तिला न्याय मिळवून देण्यासाठी तो स्वतः एकटा संघर्ष करतो. त्याच्या संघर्षाचे रूपांतर मोठ्या मोर्चा मध्ये कसे होते ते त्यालाही कळत नाही. आता त्याच्या आयुष्यात एकच लक्ष्य असते ते म्हणजे आपल्या बहिणीला न्याय मिळवून देणे. यात तो यशस्वी होतो का? त्याचे पुढे काय होते यासाठी तुम्हाला एक मराठा लाख मराठा हा सिनेमा बघावा लागेल. सिनेमात मिलिंद गुणाजी, भारत गणेशपुरे, किशोर कदम, मोहन जोशी, विद्याधर जोशी, अरुण नलावडे, संजय खापरे, नागेश भोसले, विजय पाटकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, उषा नाईक, नफिसा शेख, ढोले गुरुजी, भक्ती चव्हाण, राधिका पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाला संजय साळुंखे, अतुल लोहार आणि गणेश सातोर्डेकर यांचे संगीत लाभले आहे.