Join us
Daily Top 2Weekly Top 5

या दोन सिनेमाच्या निर्मात्यांनी काढला तोडगा,त्यामुळे तारखांचा होणारा क्लॅश टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 16:33 IST

सिनेमा रिलीजच्या तारखा एकमेकांना क्लॅश होऊ नये याची काळजी फिल्म निर्मात्यांना घेतल्यामुळे ‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ मधील क्लॅश टळला आहे.

ठळक मुद्दे‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ हे दोन सिनेमे अगोदर एकाच दिवशी प्रदर्शित होणार होते. दोन्ही सिनेमे उत्तम दर्जाचे असून, एकत्र प्रदर्शित झाले असते तर दोघांचंही आर्थिक नुकसान झालं असतं. ठरलेल्या तारखेवरच अडून न राहता सिनेमांच्या क्लॅशेसमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी निर्मात्यांनी घेतला पुढाकार.

आज मराठी सिनेमांची संख्या कमालीची वाढली आहे. त्यामुळे एकाच आठवड्यात एकाहून अधिक सिनेमे प्रदर्शित होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. एकाच शुक्रवारी दोन किंवा त्यापेक्षा अधिक सिनेमे प्रदर्शित झाल्याचा परिणाम सिनेमाच्या व्यवसायावर होत आहे. वर्षानुवर्षे असंच सुरू असलं तरी त्यावर उपाय मात्र  नव्हता.‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ च्या निर्मात्यांनी या क्लॅशवर तोडगा काढला आहे.

‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ हे दोन सिनेमे अगोदर एकाच दिवशी म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार होते; परंतु दोन्ही निर्मात्यांनी क्लॅश टाळण्यासाठी विचारपूर्वक प्रयत्न केले. या प्रयत्नांमध्ये त्यांना यशही आलं आहे. ‘जे. ए. एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ची प्रस्तुती असलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाची निर्मिती जॅान अब्राहम यांची असून दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे-जोशी यांचे आहे. वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन तसंच लवंदे फिल्म व विष्णू मनोहर फिल्म या निर्मिती संस्थांतर्गत निर्माते धनश्री विनोद पाटील यांनी ‘Once मोअर’ ची निर्मिती केली असून याचे दिग्दर्शन नरेश बीडकर यांनी केले आहे.

‘सविता दामोदर परांजपे’ आणि ‘Once मोअर’ या दोन्ही निर्मात्यांनी सिनेमांच्या प्रदर्शनाचा प्रश्न निकाली काढला आहे. ‘Once मोअर’ च्या निर्मात्यांनी आपल्या सिनेमाची रिलीज डेट ३१ ऑगस्ट ऐवजी १२ ऑक्टोबर केली आहे. दोन्ही सिनेमे उत्तम दर्जाचे असून, एकत्र प्रदर्शित झाले असते तर दोघांचंही आर्थिक नुकसान झालं असतं. चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवत दोन्ही सिनेमाच्या निर्मात्यांनी मराठी सिनेसृष्टीतील इतर निर्मात्यांपुढे एक उदाहरण ठेवलं आहे.ठरलेल्या तारखेवरच अडून न राहता सिनेमांच्या क्लॅशेसमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेत दोन पावलं मागं येण्याची गरज असल्याचं दाखवून दिलं आहे.